खासदार विशाल पाटील शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी

0
703

महाराष्ट्रातील निवडणुका ह्या दिवाळीनंतर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, राज्यात महायुती व महाविकास आघाडीचे नेते आत्तापासूनच कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे काही मतदारसंघात उमेदवारही घोषित करण्यात येत आहेत. तसेच, विविध रॅली आणि दौऱ्यांच्या माध्यमातून प्रचारालाही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, आज आटपाडी येथील एका कार्यक्रमात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी चक्क शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे, राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा विशाल पाटलांची चर्चा रंगली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने युवा चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे सांगत, 3 मतदारसंघात उमेदवार घोषित केले आहेत. तर, मनसेनंही चार मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकल्याचं दिसून येत आहेत. आता, सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी विशाल पाटील यांनी केलेल्या विधानावरुन जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसमध्ये बंड करुन अपक्ष निवडणूक लढवत विशाल पाटील यांनी दिल्ली गाठली. मात्र, विजयानंतर काँग्रेसला आपला पाठिंबाही जाहीर केला. विशाल पाटील यांच्या पाठीशी विश्वजीत कदम यांचा हात होता, असे चित्रही मतदारसंघात पाहायला मिळाले. आता, विधानसभेला विशाल पाटील यांचा हात कोणाच्यामागे याची चर्चा होत आहे.

आटपाडी बाजार समितीत आयोजित कार्यक्रमात खासदार विशाल पाटील बोलत होते. त्यावेळी, त्यांनी केलेल्या रेल्वे आणि राजकीय विधानाची चांगलीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरला जाणारी रेल्वे ही आतापर्यंत दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या आटपाडीमधून जावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील यांनी म्हटलंय. तसेच, शिवसेना शिंदे गटाचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना विधानसभेसाठी ऑफर देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उमे राहणार असल्याचे देखील पाटील यांनी स्पष्ट केले. रेल्वे आणि विधानसभेच्या अनुषंगाने खासदार विशाल पाटील यांचे वक्तव्य खानापूर आणि सांगली विधानसभा मतदारसंघात चर्चेचा मुद्दा बनले आहे.

शिंदेंच्या उमेदवाराच्या पाठिशी हात
आटपाडीत बोलताना विशाल पाटील म्हणाले की, आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा खेळ सुरू होईल. या निवडणुकीत लाखोंने मतं सुहास बाबर यांना मिळावीत, ही आमची अपेक्षा आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही शब्द सोडवून आलेलो आहोत. जिथे आमच्यावर प्रेम आहे तेथे आम्ही प्रेम देतो. आम्ही ताकदीने तुमच्या पाठिशी ठाम राहणार आहोत, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी सुहास बाबर यांना दिली. तुम्ही विधानसभेसाठी आमच्याकडून उभे रहावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण, आमचे मित्र खासदार श्रीकांत शिंदे ऐकायला तयार नाहीत, असे म्हणत विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांना पाठबळ देण्याचं आवाहन खानापूरकरांना विशाल पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे, शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी विशाल पाटलांचा हात असल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here