लोकसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. या निवडणुकीच्या कलात भाजपला मोठा फटका बसलेला दिसून येत आहे. भाजपला बहुमत मिळालेलं नाहीये. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ला देव समजायचं. आता त्यांचं नाक कापलं आहे. कापलेल्या नाकाने ते फिरत आहेत. मोदी यांचा पराभव झालाय. भाजपचा पराभव झालाय. त्यांना बहुमतही मिळालेलं नाहीये, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.
भाजपने 2014 आणि 2019मध्ये स्वबळावर बहुमत मिळवलं होतं. पण 2024मध्ये भाजपला बहुमत मिळालं नाही. हा मोदी आणि शाह यांचा पराभव आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला देव समजायचे. त्यांचं नाक कापलंय. आता कापलेल्या नाकाने ते देशात फिरतील. त्यांचं संपूर्ण नाका कापलंय. 400 पार, 300 पार. भाजपला 250 जागाही मिळालल्या नाहीत. मुंबई आणि महाराष्ट्रात आम्ही भाजपला रोखलं आहे. मुंबईत संध्याकाळपर्यंतचे निकाल पाहा, आम्ही पाच जागा जिंकणार आहोत, असा दावा राऊत यांनी केलाय.
मोदींनी राजीनामा द्यावा
राहुल गांधी यांचं नेतृत्व आणि राज्यातील ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव या सर्वांनी कठोर मेहनत केली. मोदी आणि शाह यांचा अहंकार देशातून खत्म केला आहे. आता हातपाय जोडत आहेत. आमच्यासोबत या, सरकार बनवू म्हणून विनवणी करत आहेत. मी ठाम सांगतो, मोदींचं सरकार येणार नाही. मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
जागा कमी होतील
मोदींनी आता कार्यकर्त्यांना सांगावं मी हारलोय. हा त्यांचा पराभव आहे. जनतेने मोदींना नाकारलं आहे. राम आणि बजरंग बलीने सांगितलंय घरी बसा. झोळी घेऊन निघून जा, हाच जनादेश आहे. देशात परिवर्तन होत आहे. पूर्णपणे सकारात्मक निर्णय होत आहे. जे एक्झिट पोल आम्हाला 100 जागा द्यायला तयार नव्हते, ते म्हणतात आमचे सरकार येईल. संध्याकाळपर्यंत भाजपच्या जागा कमी होतील. 240 पर्यंत जागा येतील. आता सरकार बनवण्यासाठी सर्वांना फोन करत आहेत. सर्वांना हात जोडत आहेत. पण त्यांच्याकडे कोणी जात नाहीये, असा दावाही त्यांनी केला.