मंत्री जयकुमार गोरेंच्या मुलाची हायवेवर जीवघेणी बाईक स्टंटबाजी

0
882

व्हिडिओ व्हायरल होताच इन्स्टाग्रामवरील पोस्ट केल्या डिलीट

माणदेश एक्सप्रेस न्युज
सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराजचे हायवेवरील बाईक स्टंटबाजीचे व्हिडिओ भैय्या पाटील नावाच्या व्यक्तीनं आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केलेत. जीवघेणे स्टंट करून तो स्वतःसह इतरांच्या जीविताला धोका निर्माण करत असल्याचं त्यात दिसतंय. कॅबिनेट मंत्र्याच्या मुलासाठी सरकारने वेगळे नियम, कायदे बनवले आहेत का? असा सवालही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

 

 

सातारा-कोल्हापूर महामार्गावर केलेले धोकायदायक बाईक स्टंटबाजीचे व्हिडिओ आदित्यराज गोरे यानं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. ते व्हिडिओ भैय्या पाटील यांनी आपल्या एक्स अकाउंटवरुन पोस्ट केल्यानं ही घटना समोर आली. त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे पुन्हा चर्चेत आले. स्टंटबाजीवर टीका सुरू झाल्यानंतर आदित्यराज याने ते व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून डिलीट केले.

 

 

भैय्या पाटील या एक्स युजरने आपल्या पोटमध्ये म्हटलंय की, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज हा सातारा-कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करून स्वतः सोबत इतर लोकांच्या जिविताला धोका निर्माण करत आहे. या स्टंटचे लाईव्ह रील्स स्वतःच्या सोशल मीडियावर टाकून बेकायदेशीर गोष्टीला तो प्रोत्साहित करत आहे. त्याच्या बाईकला नंबर प्लेटसुध्दा नाही. तर भैय्या पाटील यांनी एक्स पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आणि आरटीओ विभागाला टॅग केली आहे.

 

 

सर्वसामान्य व्यक्तीने असं कृत्य केलं तर त्याची गाडी जप्त करून दंड आणि शिक्षा केली जाते. मग कॅबिनेट मंत्र्याच्या मुलासाठी सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का? असा सवालही भैय्या पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय. या घटनेवरून खासदार संजय राऊतांनीही मंत्री गोरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत का? त्यांनी ठरवावं हे काय सुरू आहे? असा टोला त्यांनी लगावला आहे. यासंदर्भात जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांचे स्वीय सहायक अभिजीत काळे यांनी सांगितलं, मंत्री महोदय कामात व्यग्र आहेत. त्यासंदर्भात ते नंतर सविस्तर माध्यमांशी बोलतील.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here