युवक शेतकऱ्याची कमाल! भंगारातून बनवल मशीन! 20 मिनिटात 10 एकर शेतीची फवारणी

0
389

अलिकडच्या काळात तरुण शेतकरी (Farmers) आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसत आहेत. आधुनकिक तंत्रज्ञानाच्या (Modern technology) सहाय्यानं भरघोश उत्पादन घेत आहेत. अशाच एका नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने भांगरतून घरी 55 फूट बूम स्प्रे मशीन (Boom spray machine) बनवला आहे. याद्वारे फक्त 20 मिनिटात 10 एकर शेतीची फवारणी होते. कमलेश अशोक चौधरी असं 33 वर्षीय युवक शेतकऱ्याचं नाव आहे. जाणून घेऊयात या तरुणाची यशोगाथा.

नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील 33 वर्षीय युवक कमलेश अशोक चौधरी हा खासगी कंपनीत काम करत होता. पण वडिलांच्या आजारामुळे नोकरी सोडून 5 वर्षापूर्वी गावाकडे परतला. वडिलांच्या निधनानंतर त्यांची दहा एकर शेती तो करू लागला. कमलेश चौधरीचे शिक्षण कृषी पदवीधरपर्यंत झाले आहे. गावाबाहेर वैजाली रस्त्यावरील एका गोडाऊनमध्ये सर्व टाकाऊ वस्तू त्यानी संग्रह करून ठेवलेला आहे. दरवर्षी ते नवीन नवीन शेती अवजारावर प्रयोग युट्युब वर पाहून करीत असतात. टाकाऊपासून टिकाऊ तयार करण्याची त्याना आवड आहे. गेल्या वर्षी कमलेशने 27 फूट लांब बूम स्प्रे मॅन्युअली तयार केला होता. त्यातून त्याने 1850 एकरावर औषध फवारणी केली. यावर्षी चक्क हायड्रोलिक तोही 55 फूट लांब असा तयार केला. कमलेश ने दोन महिन्यांमध्ये 55 फूट लांब असे हायड्रोलिक बूम स्प्रे मशीन तयार केले आहे. वीस ते पंचवीस मिनिटात दहा एकरला कीटकनाशक, तणनाशक ची फवारणी करते. कमलेश चौधरी या शेतकरी ची ही कामगिरी पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहे.

कसे तयार केले मशीन?
कमलेशने तयार केलेले मशीन कसे तयार केले असा सर्वांना प्रश्न पडत असेल. तर त्याने जुने ट्रॅक्टर साडेतीन लाखाला खरेदी केले, त्यासाठी पंजाब येथुन एक लाख 75 हजाराचे इजराइल बनावटीचे बुस्टनचे एअरलेस टायर मागवले. मागील दोन टायर सहा फूट उंचीचे तर पुढील दोन टायर साडेचार फूट उंचीचे आहेत. त्याला एक हजार लिटरची टाकी बसवली आहे. ज्याला 45 हजार रुपये खर्च आला. ही टाकी ट्रॅक्टरच्या मधोमध बसवली आहे. जेणेकरून ट्रॅक्टर पुढून उचलले जाऊ नये. टाकीतील औषधी फवारणीसाठी स्पीड पंप बसवला आहे. जो एका मिनिटाला 185 लिटर पाण्याच्या प्रेशर करतो. कीटकनाशक फवारणी करताना अंगावर येऊ नये म्हणून काचेची केबिन बनवली ती त्यात पंखा बसवला आहे.हे सर्व कमलेशने दोन महिन्यात केले.

दहा एकराची फक्त वीस ते पंचवीस मिनिटात फवारणी
या मशीन चा फायदा असा आहे की, 55 फूट बूम स्प्रे केला जातो. दहा एकरला फक्त वीस ते पंचवीस मिनिटात फवारणी होते. या मशीनमुळे फवारणी करताना मजूर वर्गाला जो साप, विंचू यांचा धोका होता तो नाही. तसेच फवारणी करताना समप्रमाणात फवारणी केली जाते. या मशीनमुळे मजुर टंचाई भासत नाही, कमी वेळामध्ये, व पैशाची बचत होत फवारणी केली जाते. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं हे कमलेश ने तयार केलेल्या मशीनकडे पाहून खरं असल्याचं अनुभवास मिळतं. एकीकडे ग्रामीण भागात प्रचंड बुद्धिमत्ता असलेले तरुण आहेत. मात्र, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी समाजाने आणि सरकारने पुढे येणे गरजेचे आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here