
मुंबई | वरळी :
२० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येत असलेल्या ऐतिहासिक विजयी मेळाव्यात केवळ राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक क्षेत्रातली मराठी अस्मिता देखील उजळून निघाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो मराठी बांधवांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही या मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
मराठीपणाचा विजय साजरा करणारे कलाकार
या ऐतिहासिक सोहळ्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि चिन्मयी सुमीत उपस्थित होते.
सिद्धार्थ जाधव म्हणाले:
“या दोघांना एकत्र बघणं, ती एनर्जी अनुभवणं यासाठी आलोय. हे फक्त राजकीय नाही, हे भावनिक आहे. आज फक्त ‘साहेबांना ऐकायचंय’, असं संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय!”
तेजस्विनी पंडित यांची भावना:
“मराठी भाषेचा विजय झालाय. मराठी माणसाने जे एकत्र येऊन दाखवलं, ती वज्रमूठ मोठी आहे. आज मराठी माणूस विभागला गेलाय – पण अजूनही एकत्र येणं गरजेचं आहे.”
भरत जाधव म्हणाले:
“आपल्याच राज्यात आपण अपमानित होतोय, हे दुर्दैव आहे. मराठी माणसाने जगायला हवं, त्याचा स्वाभिमान टिकायला हवा. हे हिंदीविरोधी नाही, पण हिंदी सक्तीविरोधात नक्कीच आहे.”
चिन्मयी सुमीत यांची स्पष्ट भूमिका:
“ही केवळ सभा नाही, तर एक लढ्याचं रूप आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे पुढाकार घेत आहेत, तो खूप सकारात्मक आहे. आम्हाला कुणी आमंत्रित केलं नाही, पण आम्ही आलो कारण ही मराठी माणसाची गोष्ट आहे!”
कलाकारांचा सहभाग म्हणजे ‘मराठीपणाचा आवाज’
या चौघांनीही स्पष्ट केलं की, त्यांचा सहभाग राजकीय नसून मराठी भाषेच्या अस्मितेच्या संघर्षाशी जोडलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या ऐतिहासिक मेळाव्याकडे बघणाऱ्या जनतेसाठी कलाकारांचं हे समर्थन एकप्रकारे मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व आहे.
राजकीय मेळावा की जनजागृतीची लाट?
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने एकीकडे राज्यातील राजकारणात भूकंप घडतोय, तर दुसरीकडे मराठी भाषा, संस्कृती, आणि अस्मिता या मुद्द्यांवर समाजमन एकत्र येताना दिसतंय. राजकीय नेतृत्त्व आणि कलाविश्वाचा हा संगम महाराष्ट्राच्या जनतेला एका नव्या दिशा दाखवण्यास समर्थ ठरेल, अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.