
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी (प्रतिनिधी) : गेली आठ दिवसांपासून माणगंगा नदीच्या खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे राजेवाडीचा तलाव भरून वाहू लागला असून, परिणामी माणगंगा नदीला पूर आला आहे. आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील माणगंगा नदीवरील पुलावर पाणी आल्याने येथील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. नदी सध्या दुधडी भरून वाहत आहे. या पूरस्थितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राजेवाडी हा आटपाडी तालुक्यातील सर्वात मोठा तलाव आहे.. या तलावात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होतो आणि परिसरातील शेतीला त्याचा मोठा आधार असतो. यंदा पावसाळ्याची सुरुवातच दमदार झाल्याने राजेवाडी तलाव भरून ओसंडू वाहू लागला आहे. त्यामुळे माणगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
पिंपरी खुर्द गावाजवळील माणगंगा नदीवरील पुलावर तब्बल दोन फूटांपर्यंत पाणी वाहू लागले आहे. प्रशासनाने तातडीने येथे वाहतुकीस बंदी घातली असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुलावर पाणी असल्याने दोन्ही बाजूंनी वाहने अडकली असून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.
दरम्यान, नदीला आलेल्या पुरामुळे शेतीला दिलासा मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाची भावना आहे. शेतीच्या तयारीसाठी आवश्यक असलेले पाणी आता उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांचे चेहरे खुलले आहेत. पावसाने सरासरी भरून काढल्यास यंदाचा हंगाम भरघोस राहण्याची अपेक्षा आहे.
तालुका प्रशासनाकडून सतत पावसाच्या स्थितीवर व नदीच्या पातळीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.