‘महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजेत, मात्र, त्यात रश्मी ठाकरे यांचं नाव नको’; असं का म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

0
420

 

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महिला मुख्यमंत्री या विषयावर बोलताना एक मोठं वक्तव्य केलं आहे. “रश्मी ठाकरे (शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी) यांनी कधीही राजकारणात रस दाखवला नाही. त्यामुळे त्यांच्या नावाची राजकीय चर्चा करू नये. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजेत, मात्र, त्यात रश्मी ठाकरे यांचं नाव असता कामा नये”. असं पेडणेकर म्हणाल्या. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी मंगळावारी (१७ सप्टेंबर) प्रसारमाध्यमांसमोर म्हटलं होतं की “सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात”. त्यावर पेडणेकर यांनी आज प्रतिक्रिया दिली.

महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, असं आव्हान महायुतीने दिलेलं असतानाच मविआमधील प्रमुख नेते व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील तशी मागणी केली होती. दरम्यान, दिल्लीला आतिशी यांच्या रुपाने पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री लाभल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना प्रश्न विचारला. त्यावर, ‘सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात”, असं गायकवाड म्हणाल्या. त्यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी वर्षा गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. रश्मी ठाकरे यांनी कधीही राजकारणात रस घेतला नाही. त्या नेहमी त्यांच्या पतीबरोबर असतात याचा अर्थ असा होत नाही की त्या राजकारणात सक्रीय आहेत. महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजेत. मात्र, कारण नसताना रश्मी ठाकरे यांचं नाव त्या चर्चेत असता कामा नये”.

“महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झाली तर मला आनंदच होईल. ५० टक्के आरक्षण देण्यात आपण पहिलं राज्य होतो. महिला मुख्यमंत्री झाली तर आनंद होईलच. सगळ्या पक्षांकडे चेहरे आहेतच. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळेंचा चेहरा आहे, शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे रश्मी ठाकरे आहेत. तर काँग्रेसमध्येही चेहरे आहेत. महाविकास आघाडीमधील कोणत्याही पक्षाच्या महिला नेत्याला मुख्यमंत्रिपद मिळालं तर मला आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो, अनेक अडचणी असतात. त्यावर मात करून महिला राजकारणात येतात. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींना काम करताना आम्ही पाहिलं आहे. भाजपात तर महिलांना मंत्रिपदही दिलं जात नाही, पक्षाचं अध्यक्षपद दिलं जात नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here