महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या ऑडी कारने ५ वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी पहाटे अपघात घडला. नागपूरच्या रामदासपेठ परिसरात हा अपघात घडला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनी या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करून घेतला आणि दोन जणांना अटक केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रामदासपेठे येथे पहाटे १ वाजता घडला. ऑडी कारची धडक जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला धडकली. या अपघातात दोन तरुण जखमी झाले. ऑडी मानकापूर भागाकडे निघाली त्यावेळीस तिथल्या टी पॉइंटवर पोलो कारला धडकली. त्यातील चालकांनी ऑडीचा पाठलाग केला आणि ऑडी मानकापूर पुलाजवळ थांबवली. त्यानंतर तेथून संकेत आणि तिघेजण पळून गेले. पोलो कारमधील प्रवाश्यांनी अर्जुन व रोनितला थांबवले. घटनेची माहिती पोलिसांना दिली. आणि या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
तक्रारदार सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून रॅश ड्रायव्हिंग आणि इतर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. अर्जुन आणि रोनित यांचीय काही वेळानंतर जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे अशी माहिती पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेसंदर्भात दुसऱ्या दिवशी पत्रकरांशी बोलताना भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑडी कार त्यांचा मुलगा संकेत याच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे मान्य केले. पोलिसांनी या घटनेचा कोणताही पक्षपात न करता सखोल आणि नि: पक्षपातीपणे तपास करावा जे दोषी आढळतील यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी माहिती माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी दिली.
माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे. या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही.
या संदर्भात अधिक माहिती अशी मिळाली की, ऑडी कारची दोन्ही नंबर प्लेट काढण्यात आली. कार कोणाच्या मालकीची आहे हे कळू नये यासाठी हे करण्यात आले अशी चर्चा आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु केली आहे. तसेच दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अहवालांची प्रतिक्षा आहे.