येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा

0
388

बदलापूरच्या घटनेने (Badlapur Sexual Abuse Case) समाजमन हेलावून गेलं आहे. खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रातील लहान मुली देखील सुरक्षित नाही. महाराष्ट्रातील घटना ही महाराष्ट्रालाच काळीमा फासणारी आहे. किंबहुना हे प्रकरण दाबण्यासाठी सरकारनेच प्रयत्न केले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे. प्रकरणातील शिक्षण संस्था भाजप आणि संघाशी निगडित असल्याने भाजप आणि संघाची बदनामी होऊ नये म्हणून अशा पद्धतीची काळजी त्या ठिकाणी घेत आहे. परिणामी, त्याचा उद्रेक समाजामधून झाल्याचे काल बघायला मिळाले. सत्ता आणि सत्तेची गर्मी त्यातून त्याची गुरमी या ठिकाणी बघायला मिळालीय.

मला या घटनेत राजकारण करायचं नाही. मात्र, महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचं काम रोज राज्यात होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्राला अपमानित आणि काळ लावण्यात येत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. या गंभीर प्रश्नावर आम्ही महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) चर्चा केली आणि येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिली असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी केली आहे.

भाजपकडून बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न – नाना पटोले
महायुतीतील एका पदाधिकाऱ्यांनी एका महिला पत्रकारासोबत अतिशय विकृत शब्दात या घटनेवर भाष्य केलंय. ही घटना निषेधार्थ असून त्यांना या घटनेशी काहीही देणंघेणं नसल्याचे यातून दिसून आले आहे. या सर्व प्रकरणाचा निषेध म्हणून आम्ही येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देत आहोत. या आंदोलनात महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष, घटक पक्ष, अनेक संघटना, शाळा कॉलेज, दुकानदार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. सध्या घडीला महाराष्ट्रात जे अकार्यक्षम सरकार आहे, त्याला आपली जागा दाखवण्याचा प्रयत्न नागरिक करतील, असा विश्वासही नाना पटोले यांनी बोलताना व्यक्त केला. आज मुंबई येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली. त्यानंतर नाना पटोले (Nana patole) यांनी ही घोषणा केली आहे.

प्रकरण दाबले गेले, तर त्याला जबाबदार कोण?
बदलापूर अत्याराच्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आलीय, या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेत सरकारवर टीका केली आहे. ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे. त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून नेमणूक केलीय, ज्याने लोकसभेची निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले, तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here