
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : कुंडल येथील जैन तीर्थ क्षेत्रावरील भगवान पार्श्वढनाथांच्या प्रतिमेची व पद्मावती देवीच्या प्रतिमेची विटंबना प्रकरणाचा जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोकर, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, वन विभागाचे अधिकारी डॉ. अजित साजणे, तहसीलदार लीना खरात, रमेश आरवाडे, स्वप्नील शहा आदि उपस्थित होते. कुंडल येथील मंदिरात काही समाजकंटकांनी मूर्तींची तोडफोड केल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला होता. या पार्श्वभूमिवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा पोलीस प्रमुख यांनी या दुष्कृत्याच्या तपासासाठी विशेष पथक गठीत करून तातडीने तपास करावा, अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशा सूचना यावेळी श्री. गांधी यांनी दिल्या. तसेच, या तीर्थक्षेत्राचा अ वर्ग पर्यटनस्थळांमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. त्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून द्यावा. कुंडल येथील मंदिरात सीसीटीव्हींची व्यवस्था करावी. तसेच, या पर्यटनस्थळी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीपूर्वी ललित गांधी कुंडल येथे भेट देऊन पाहणी केली.