कोल्हापूर : करवीरचे काँग्रेसचे आमदार यांचे निधन ; 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
1

कोल्हापूर/माणदेश एक्सप्रेस न्युज : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पी. एन. पाटील यांचे आज (गुरूवार) पहाटे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमदार पी. एन. पाटील हे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक होते.

 

पी. एन. पाटील हे रविवारी बाथरूममध्ये पाय घसरून पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली, आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पी. एन. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार असून त्याठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे समजते.

कोण होते पी.एन.पाटील
करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेले पी. एन. पाटील यांची कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळख होती. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद सलग १८ वर्ष आमदार पाटील यांच्याकडे होते. काँग्रेसच्या पडत्या काळात त्यांनी पक्षाला उर्जित अवस्था दिली. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यासह गांधी कुटुंबीयांशी त्यांचे निकटचे संबंध होते. पी. एन. पाटील हे गोकुळ दूध संघातील एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे कोल्हापूरसह राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here