करमाळा/माणदेश एक्सप्रेस न्युज : उजनी धरणात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत ६ जण बुडाले होते. यापैकी ५ जणांचे मृतदेह आज गुरुवारी पाण्यावर तरंगताना आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
मृतदेहांमध्ये तीन पुरुष, एक महिला, एक लहान मुलाचा समावेश आहे. अजूनही एका व्यक्तीचा मृतदेह सापडला नसून त्याचा शोध घेणे सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भीमा नदीत मंगळवारी बोट बुडाल्याची घटना घडली होती.
नदीतील बोट उलटल्याने ६ प्रवासी पाण्यात बुडाले होते. एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला. बुधवारी या पथकाला नदीत बुडालेली बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली. त्यानंतर बोटीवर असलेली मोटारसायकल देखील पथकाला सापडली.
मात्र, ३६ तास उलटूनही बोटीतील पाण्यात बुडालेले व्यक्ती आढळून आले नाहीत. बुधवारी दिवसभर शोधमोहीम राबविल्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने गुरुवारी सकाळी पुन्हा बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला. यावेळी पथकाला ६ पैकी ५ जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. अजूनही एकजण बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.
मृतामध्ये यांचा समावेश
या दुर्घटनेत बुडालेल्या व्यक्तींमध्ये गोकुळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल दत्तात्रय जाधव (वय २५) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय ३) अनुराग अवघडे (वय ३५) गौरव धनंजय डोंगरे (वय १६) यांचा समावेश आहे.