महाराजांच्या पुतळ्याला हार घालून खाली येत असताना जयंत पाटील आणि अमोल कोल्हे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले

0
434

 

 

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) राज्यभरात जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटानेही शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरूवात केली आहे. आज राज्यात पुन्हा रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. ही यात्रा आज (शुक्रवारी) शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली आहे. यात्रेत महायुतीचे काळे कारनामे जनतेपुढे उघड केले जातील, असा इशारा त्यांनी दिला. मात्र शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?
शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. क्रेनच्या सहाय्याने पुतळ्याला पुष्पहार घालून खाली येत असताना क्रेनची ट्रॉलीमध्ये बिघाड झाला. यामुळे जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख थोडक्यात बचावलेत, सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नसून सर्व जण थोडक्यात बचावले आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

पुष्पहार घालून खाली उतरताना अर्ध्यावर पोहचल्यावर क्रेन तुटली. जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख खाली पडण्याची शक्यता होती. सुदैवाने, कुणालाही दुखापत झाली नाही पण यात्रेच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.

पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून फिरणार
पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून फिरणार आहे. त्यानंतर लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाईल. 9 ऑगस्ट हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे, या दिवशीच महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ‘चले जाओ’ चळवळीचा नारा ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसेच जागतिक आदिवासी दिवस असल्याने 9 ऑगस्टची निवड केल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

पहा व्हिडीओ: