शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे 853 कोटी रुपये

0
403

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा जनसन्मान यात्रा दौरा नाशिकमध्ये आहे. या दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची घोषणा केली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम खात्यात जमा होणार आहे. येत्या 31 ऑगस्टपूर्वी त्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

पिक विमा व जिल्ह्यातील कृषी संबंधित विषयांच्या संदर्भात पुढील आठवड्यात मुंबईत एक बैठक होणार आहे. या बैठकीला पिकविमा कंपनीचे अधिकारी, छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश
काल जनसन्मान यात्रानिमित्त धनंजय मुंडे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली असता, त्यांनी प्रलंबित विम्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर आज सकाळी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव उपस्थित होते.

त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाआधारे व उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असलेले 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांना मिळाली. त्यानंतर कंपनीचे राज्यप्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले.

5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ
या कंपनीनेही धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार 31 ऑगस्ट पर्यंत ही रक्कम देण्याचे मान्य केले. त्याचा लाभ जिल्ह्यातील जवळपास सर्व पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे .

गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यातील पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांनी विमा पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये 21 दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना 79 कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. त्याचबरोबर स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या पोटी 25 कोटी 89 लाख मंजूर झाले होते आणि त्याच्या वाटपाची कारवाई सुरु आहे. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here