मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान,फडणवीस कुटुंबात राजकारणातला शेवटचा…….

0
459

माणदेश एक्सप्रेस/नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली आहे. यावेळी नागपूरमध्ये एका मुलाखतीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांवर भाष्य केलं. मुलाखतीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण आणि कुटुंब याबाबत विचारलेल्या प्रश्नांना मिश्किल स्वरुपात उत्तरं दिली. यावेळी त्यांनी आई सरिता देशमुख आणि मुलगी दिविजा यांचे कौतुक केले. तसेच आमच्या कुटुंबात माझ्यापर्यंत राजकारणातली शेवटची पिढी असल्याचेही म्हटलं.

 

स्वर्गीय विलास फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा बहुउद्देशिय विकास संस्थेच्या जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. ज्येष्ठ संपादक विवेक घळसासी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी आमच्या घरात सगळ्यात प्रगल्भ माझी मुलगी असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

“मी गमतीने नेहमी म्हणतो की आमच्या घरात सगळ्यात प्रगल्भ दिविजा आहे. तिचं वय १५ वर्ष आहे. पण तिच्याकडे कमी वयात खूप प्रगल्भता आहे. मी मुख्यमंत्री होणार हे सगळं चालू होतं तेव्हा माध्यमांनी तिला प्रश्न विचारला. अशावेळी अडचणीत प्रश्न विचारले जातात. तिने सांगितले की जो मुख्यमंत्री होईल तो महायुतीचा होईल. नेते ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल. ही प्रगल्भता तिच्यामध्ये आहे. तिला यातलं अंतर समजतं. तिला माहिती आहे की राजकारणात टार्गेट केलं जातं. त्यामुळे मला वाटतं की ती तिच्यामध्ये उपजत आली किंवा तिनं आपोआप आत्मसात केलं. फार काही आम्ही तिला शिकवलं असं नाही. तिला राजकारणात यायचं असेल तर तिने जरुर यावं. पण माझा स्वतःचा समज असा आहे की, फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणातला शेवटचा मी आहे,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.