डोळ्यांच्या खालची त्वचा हा आपल्या चेहऱ्यावरचा अत्यंत संवेदनशील भाग आहे. आपण एका मिनिटात साधारण १५ वेळा पापण्यांची उघडझाप करतो. त्यामुळे १ मिमीपेक्षाही कमी जाडीच्या डोळ्यांखालची त्वचेची विशेष काळजीची गरज आहे, यात काही आश्चर्य नाही. डोळ्याखालच्या भागाची दररोज विशेष काळजी घेतल्यानं काळी वर्तुळे, डोळ्यांखालचा भाग सूजणे,किंवा डोळ्यांखाली बारीक रेषा कमी होण्यास मदत होते असं तज्ञही सांगतात.
देशात बहुतांश लोकांचा दिवसाचा स्क्रीनवर घालवलेला वेळ हा साधारण ७.३ तासांचा आहे, असे रेडसीर स्ट्रॅटजी कन्सल्टन्ट्सचा अहवाल सांगतो. त्यामुळे डोळ्यांवर पडणाऱ्या ताणामुळे डोळ्यांखाली वर्तुळं येण, थकवा येणं, डोळ्यांखालची त्वजा लूज पडणे, त्वचेवर बारीक रेषा येणं अशा कितीतरी समस्या दिसतात. सध्या अनेकजण चेहऱ्याला हायड्रेट करण्यासाठी वेगवेगळे प्रोडक्ट वापरत असल्याचं दिसतं. पण विशेष डोळ्यांखालच्या त्वचेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. या त्वचेला नितळ ठेवायचं असेल तर त्याला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे.
दैनंदिन हायड्रेशनसाठी अनेकजण वेगवेगळे फेसमास्क, सिरम, वापरताना दिसतात. पण डोळ्यांखालच्या त्वचेला योग्य हायड्रेट करण्यासाठी काही घरगुती उपायही करता येतील.
पुरेशी झोप घ्यावी
आपल्या झोपेचा आणि आपल्या त्वचेच्या नितळतेचा फार जवळचा संबंध आहे. जागरण झाल्याने डोळ्यांवर ताण पडतो आणि ओघानेच डोळ्यांखालची त्वचाही काळी पडते. यासाठी पुरशी झोप घेणे हा त्यावरचा आपल्या हातात असलेला उपाय आहे, असे तज्ञ सांगतात.
भरपूर पाणी प्या
भरपूर पाणी पिणे हा त्वचेच्या हायड्रेशनचा सर्वात चांगला उपाय आहे. भरपूर पाणी पिल्याने त्वचा तजेलदार होऊन निरोगी राहते. साधारण दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे यामुळे काळ्या वर्तुळांचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.
चहा कॉफी वारंवार पिणे टाळा
कामाच्या ताणामुळे अनेकांना दिवसातून खूपवेळा चहा कॉफी प्यावी लागते. पण यामुळे त्वचेवर बारीक पुरळं येणं, त्वचा काळी पडणं अशा समस्या येऊ शकतात.
बटाट्याचा रस
बटाटा बारीक किसून त्याचा रस काढून तो काळ्या वर्तुळाभोवती लावावा किंवा बटाटाच्या चकत्या डोळ्यांवर 10 मिनिटे ठेव्याव्यात. त्यानंतर चेहरा गार पाण्याने धुवावा. हा उपाय नियमित काही दिवस केल्यास डोळ्याखालचे काळी वर्तुळे कमी होतील.