‘हाऊसफुल 5’ चा टीझर प्रदर्शित; 18 कलाकार, धमाल कॉमेडी आणि मर्डर मिस्ट्रीचा ट्विस्ट!

0
96

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘हाऊसफुल’च्या पाचव्या भागाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यांचा हा चित्रपट नेहमीप्रमाणे विनोदाने भरलेला असणारच आहे. मात्र यावेळी त्यात एक भन्नाट ट्विस्ट देखील पाहायला मिळणार आहे.

 

‘हाऊसफुल 5’ या चित्रपटात तब्बल 18 कलाकार झळकणार आहेत. त्यांच्या या यादीमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, फरदीन खान, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नरगिस फाकरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चंकी पांडे, जॉनी लीवर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, चित्रांगदा सिंग, रंजीत, सौंदर्या शर्मा आणि निकितिन धीर यांचा समावेश आहे.

 

एका चित्रपटात एवढे कलाकार पाहायला मिळणं ही आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, प्रत्येक अभिनेत्याला पडद्यावर किती वेळ मिळेल? काहींना तर हा चित्रपट ‘बिग बॉस’च्या नव्या सीझनसारखाही वाटतोय. टीझरमध्ये, नेहमीप्रमाणे काही गोंधळ दाखवण्यात आला आहे. यावेळी मात्र कथा थोडी वेगळी वाटते, कारण या सर्व पात्रांमध्ये एक जण खून करत असल्याचे समजते. म्हणजेच, ही एक विनोदी मर्डर मिस्ट्री असणार आहे.

 

साजिद नाडियाडवालाने टीझर शेअर करताना लिहिले, ‘आजपासून 15 वर्षांपूर्वी वेडेपणा सुरू झाला! भारतातील सर्वात मोठी फ्रँचायझी आपल्या पाचव्या भागासह परतली आहे. यावेळी ती फक्त गोंधळ आणि विनोद नाही, तर एक ‘किलर’ कॉमेडी असणार आहे!’

 

चित्रपट 6 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांनी टीझरवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले, ‘1000 कोटी लोड होत आहेत!’, तर कुणी लिहीले, ‘किलरचा मास्क ‘स्क्विड गेम’मधील फ्रंटमॅनसारखा दिसतोय, खूपच इंटरेस्टिंग वाटतोय.’ तर काहींनी चित्रपटाच्या कथेला ‘मर्डर मिस्ट्री’ची झलक असल्याचंही म्हटलंय.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here