
माणदेश एक्सप्रेस न्यूज|कोल्हापूर : प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज मंगळवारी शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूरमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आले. शिरोली येथील पंचगंगा नदीच्या पुलावर पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ‘रोको आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांवर वळवली आहे. पुण्याकडे जाणारी वाहने कागलकडून लक्ष्मी टेक, एमआयडीसी, इचलकरंजी, हातकणंगले, सांगली, पेठवडगाव, वाठार मार्गे वळवण्यात आली आहेत. तसेच काही वाहने उजळाईवाडी, शाहूनाका, कसबा बावडा, शिये फाटा मार्गे पुण्याकडे जात आहेत. कागलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीही शिये फाटा आणि जुन्या महामार्गाचा पर्यायी वापर केला जात आहे.
आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी ३०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात लागू असलेल्या बंदी आदेशांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राजू शेट्टी यांना नोटीस बजावली आहे. आंदोलनासाठी परवानगी नसल्याने कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असून, शेट्टी यांचा पुढील निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.