
माणदेश एक्स्प्रेस/बारामती : बारामती तालुक्यातील ८ ते १५ वयोगटातील मुलींना कर्करोगावरील मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.बारामती येथे आयोजित एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी पवार म्हणाले, नुकतीच अदर पुनावाला यांची भेट झाली होती.
यावेळी पुनावाला यांनी महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगावरील लस विकसित केल्याचे सांगितले. ८ ते १५ वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येते. एका लसीसाठी २ हजार रुपये खर्च येतो. बारामती शहर, तसेच तालुक्यातील संबंधित वयोगटातील मुलींना हे लसीकरण मोफत करण्यात येईल. राज्य आणि देशपातळीवर याबाबत निर्णय होईल त्यावेळी होईल. मात्र, बारामतीत त्या वयोगटातील मुलींना मोफत लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व मुलींना एकत्रित करून लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्याची सूचना यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.