महाराष्ट्रगुन्हेताज्या बातम्या

खोटे लग्न करून देगाव (वा) येथील कुटुंबाची ३ लाख २१ हजारांची फसवणूक ; चार महिला अटकेत

या टोळीने खोटा विवाह लावून अनेकांना फसविल्याचा संशय असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मोहोळ : माणदेश एक्सप्रेस न्युज: खोटा विवाह लावून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीचा मोहोळ पोलिसांनी पर्दाफाश केला. देगाव (वा) येथील कुटुंबाची ३ लाख २१ हजारांची फसवणूक या टोळीने केली होती. या टोळीने खोटा विवाह लावून अनेकांना फसविल्याचा संशय असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देगाव (वा) (ता. मोहोळ) येथील नितीन विष्णू भोसले (वय 25) हे मुंबई येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. वडील शेती तर भाऊ महावितरणमध्ये नोकरी करतो. दरम्यान, नितीन याचा थोरला भाऊ सचिन (वय 30) याच्या विवाहासाठी मुलगी शोधण्याचे काम सुरू होते. मात्र, विवाह जुळून येत नव्हता. दरम्यान, नितीन याने त्याच्या मावस भावाला सचिनसाठी मुलगी बघ, असे सांगितले होते. मावस भावाने विवाह जुळविणारा एजंट गंगाधर लाडबा ढेरे (रा. कोळेगाव बुद्रुक, ता भोकर, नांदेड) याचा नंबर नितीनला दिला.

दिलेल्या नंबरवर नितीनने संपर्क साधला असता मुलगी आहे, परंतु विवाह जमला तर रोख रक्कम अडीच लाख व गाडी भाड्यासाठी अकरा हजार रुपये रोख असे एकूण 2 लाख 61 हजार रुपये द्यावे लागतील, अशी अट घातली. ती अट मान्य झाल्यावर मुलीकडच्या मंडळींनी व्हॉट्सअॅप वर मुलीचे फोटो पाठविले. घरातील सर्वांना ती मुलगी पसंत पडल्यावर नितीनच्या कुटुंबीयांनी रक्कम देण्याची तयार दाखविली.

दरम्यान 2 एप्रिल रोजी मुलगी व अन्य 5 जण असे एकूण 6 जण दुपारी दोन वाजता चारचाकी गाडीतून देगाव येथे आले. घरी आल्यावर सर्वांची संयुक्त बैठक झाली. ठरल्या प्रमाणे रोख रक्कम देण्याचे व त्याच दिवशी विवाह करण्याचे ठरले. 2 लाख 41 हजार रुपये मुलीच्या नातेवाईकांना पोहोचले. पैसे मिळाल्यावर त्याच दिवशी 2 एप्रिलरोजी सायंकाळी साडेसहा वाजता भोसले कुटुंबियाच्या घरी घरगुती पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. आलेले नातेवाईक मुलीला सोडून गेले.

दरम्यान 10 एप्रिल रोजी मुलीचा भाऊजी शैलेश याचा फोन आला की, घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तुम्ही मुलीला घेऊन या व कार्यक्रम संपल्यावर परत घेऊन जा. त्या प्रमाणे वडील व मुलगी 13 एप्रिलरोजी रात्री खासगी लक्झरीने गेले. ते 14 रोजी सकाळी साडेसात वाजता नागपूर हायवे वर उतरले. त्यावेळी शैलेश हा त्या ठिकाणी आला होता. त्याने रिक्षा करून मुलगी व विष्णू भोसले यांना अकोला बस स्थानकावर घेऊन गेला. विवाहित मुलगी लघुशंकेचे निमित्त करून गेली ती परत आलीच नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे विष्णू भोसले यांच्या लक्षात आले. घरातून जाताना मुलीने अंगावर सोन्याचे दागिने, फुले, झुबे, मंगळसूत्र चांदीचे पैंजण व जोडवी असा एकूण 53 हजारांचा ऐवज व घरातील रोख 27 हजार रुपये घेऊन गेली.

दरम्यान 25 मेरोजी नितीन भोसले व कुटुंबीयांना समजले की, आपली फसवणूक केलेल्या महिला पेनुर (ता. मोहोळ) येथील एका मंगल कार्यालयात कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील प्रथमेश भोसले यांचा फसवून विवाह करण्यासाठी येणार आहेत. खातर जमा करण्यासाठी नितीन भोसले व कुटुंबीय पेनुर येथील मंगल कार्यालयात गेले. त्या ठिकाणी फसवणूक केलेल्या महिला त्यांना दिसून आल्या. या प्रकरणातील चार महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दोघे जण फरार आहेत. अटक केलेल्या चौघींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या घटनेचा तपास हवालदार चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत. (स्त्रोत-पुढारी)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button