
माणदेश एक्स्प्रेस/कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात शुक्रवारी मावळतीच्या सूर्यकिरणांनी सलग दुसऱ्या दिवशी देवीला सोनसळी अभिषेक केला. गुरुवारपेक्षा किरणांची तीव्रता जास्त असल्याने चरणापासून किरिटापर्यंत देवीची मूर्ती न्हाऊन निघाली. यावेळी भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला. सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी किरणे लुप्त झाली.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनवेळा किरणोत्सव होतो. नव्या वर्षातील पहिल्या किरणोत्सवात गेल्या तीन दिवसांपासून सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीवर येत आहेत. गुरुवारी किरणे देवीच्या मूर्तीच्या मळवटापर्यंत आली होती. पण शुक्रवारी किरणांची प्रखरता अधिक असल्याने किरणे किरीटाच्यावरपर्यंत गेली. अगदी प्रभावळीवरदेखील त्याचे वलय दिसत होते. महाद्वार रोडवर ५ वाजून २८ मिनिटांनी आलेल्या किरणांनी एक एक टप्पा पार करत ६ वाजून १२ मिनिटांनी चरणस्पर्श केला.
एक एक मिनिटांच्या अंतराने खांद्यापर्यंत आली. ६ वाजून १६ मिनिटांनी सूर्यकिरणे चेहऱ्यावर आली. एक मिनिटे चेहऱ्यावर स्थिरावली. ६ वाजून १८ व्या मिनिटाला किरणे अडथळ्यांमागे लुप्त झाली. यानंतर अंबाबाईची आरती करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, प्रा. मिलिंद कारंजकर उपस्थित होते.
आज शनिवारी किरणोत्सवाचा चौथा दिवस आहे. पण या कालावधीत किरणे अडथळ्यांमागे जातात असा अनुभव आहे. शनिवारी काय होते याची उत्सुकता आहे.