अखेर तब्बल 10 तासांच्या प्रतिक्षेनंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर पहिली ट्रेन धावली

0
141

बदलापुरातील एका नामांकीत शाळेत अवघ्या अडीच वर्षांच्या दोन चिमुडींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच हे संतापजनक कृत्य केलं. हे प्रकरण घडून सात दिवस झाले तरीही अपेक्षित अशी कारवाई झाली नाही, असा आरोप करत संतप्त जमावाने आज बदलापूर रेल्वे स्थानकाचं कामकाज ठप्प केलं. या आंदोलनात बदलापुरातील शेकडो आंदोलक सहभागी झाली. या आंदोलकांना तब्बल 10 तास रेल्वे वाहतूक रोखून धरली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला. पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी ते मंत्री गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक आमदारांनी आंदोलकांना रेल्वे रुळाहून बाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं. पण आंदोलकांनी ऐकलं नाही. अखेर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि रेल्वे स्थानक खाली करण्यात आलं.

पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील गर्दी पांगवल्यानंतर आंदोलकांकडून पोलिसांच्या दिशेला दगडफेक झाली. पण पोलिसांनी आंदोलकांना न जुमानता तिथून हटवलं. या झटापटीत काही आंदोलक जखमी देखील झाले. आंदोलकांनी लाठीचार्जनंतर रेल्वे स्थानकाबाहेर पोलिसांच्या दोन वाहनांची तोडफोड केली. तसेच एका एसटी गाडीवर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना तिथून हटवलं. पोलिसांनी रेल्वे स्थानक खाली केल्यानंतर तिथे सर्वसामान्य नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली. यानंतर पोलिसांनी अहवाल तयार करुन रेल्वे प्रशासनाला पाठवला.

रेल्वे वाहतुकीला आता कोणताही फटका बसणार नाही. आंदोलकांना रेल्वे स्थानकापासून हटवलं आहे. रेल्वे वाहतुकीस आता सुरक्षित वातावरण तयार करण्यात आल्याचा अहवाल पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला पाठवला. यानंतर एक इंजिन रेल्वे स्थानकावर चालवण्यात आलं. जवळपास अर्धा तास ही ट्रायलची कार्यप्रणाली सुरु होती. रेल्वे वाहतुकीस वातावरण सुरक्षित असल्याची खातरजमा झाल्यानंतर या ठिकाणी सामान्य प्रवाशांसाठी वाहतूक सुरळीत करण्यात आली.

रेल्वे विभागाकडून काय माहिती देण्यात आली?
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. “मध्य रेल्वेवर सकाळी १०.१० वाजता आंदोलक होते. ते आता हटवण्यात आले आहेत. ज्या ट्रॅकवर लोक बसले होते, त्या दोन्ही ट्रॅकवर एक इंजिन चालवण्यात येईल. सोबत आरपीएफ जवान असतील. अप आणि डाऊन मार्गावर कुणी नाही याची खात्री करतील. त्यानंतर त्या भागातील अंबरनाथ ते कर्जत दरम्यान लोकल आणि मेल एक्स्प्रेस चालवल्या जातील. २५ ते ३० मिनिटे टेस्टींगला लागतील”, अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

ट्रॅकवर काही अडथळा नाही याची खातरजमा केली जाईल. त्यानंतर सेवा सुरु होईल. राज्य पोलिसांकडून मदत मिळत आहे. संयुक्तरित्या कार्यवाही केली जाईल. ४०हून अधिक लोकल रद्द झालेल्या आहेत. १५ मेल एक्सप्रेसला कर्जत, कल्याण, दिवा या स्थानकांदरम्यान परावर्तित केल्या आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here