माणदेश एक्सप्रेस न्युज/सांगली : जिल्हा जिल्हा मध्ववर्ती सहकारी बँकेच्या तासगाव तालुक्यातील चार, जत, आटपाडी तालुक्यातील प्रत्येकी एक अशा सहा शाखांमध्ये आठ कर्मचाऱ्यांनी दोन कोटी ४३ लाखांचा अपहार केला आहे.
अपहारातील सर्व कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली असून, याप्रकरणी यापूर्वी तिघे निलंबित असून सद्या शाखा अधिकाऱ्यांसह पाच कर्मचारी निलंबित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या नेलकरंजी (ता. आटपाडी), बसरगी (ता. जत) शाखा आणि तासगाव तालुक्यातील मार्केट यार्ड शाखा, निमणी, हातनूर आणि सिध्देवाडी शाखेत अपहार झाल्याचे उघडकीस आले. सहा शाखांमध्ये दोन कोटी ४३ लाख रुपयांचा अपहार झाला आहे.
पुढे बोलताना अध्यक्ष आमदार नाईक म्हणाले, जिल्ह्यातील सर्व शाखांच्या तपासणीसाठी बॅंकेने सहा पथके आणि ४८ कर्मचारी यांची नियुक्ती केली असून येत्या चार दिवसात सविस्तर अहवाल मिळेल. या प्रकरणी शाखेचे कर्मचारी योगेश वजरीनकर, प्रमोद कुंभार, शाखाधिकारी एम. व्ही. हिले यांना यापूर्वीच निलंबित केले आहे. संजय पाटील व अविनाश पाटील यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. यापुढे पाच वर्षांवरील ठाणेदारांच्या बदल्या होतील. जिल्हा बँकेने कडक धोरण अवलंबिले असून तपासणी झालेल्या शाखांच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर, अपहार मध्ये वाढ होणार का? हे समजून येणार आहे.