राज्य सरकारने राज्यातील अडीच कोटींपेक्षा जास्त महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यानुसार, सर्वच पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ थेट बँक खात्यात मिळणार आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील दोन महिलांन या योजनेचा लाभ घेणार आहे. त्यामुळे, या योजनेसाठी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करणे आणि अर्ज शासन दरबारी जमा करण्यासाठी महिला भगिनींची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे. गावोगावी या योजनेच्या अंमलबजावणीच्या होत असलेल्या बैठका, सूचना आणि महिलांची धावपळ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांकडूनही या योजनेसाठी महिलांचे अर्ज भरुन दिले आहेत. त्यावरुनच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. तसेच, लाडक्या बहिणींना मोलाचा सल्लाही दिला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरत असून गावोगावी महिलांची गर्दी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी होत आहे. त्यामुळेच, या योजनेत सरकारने नव्याने 7 बदल केले असून अत्यंत सहज व सुलभरित्या ही योजना राबविण्यासाठी नियमांत बदल केले आहेत. त्यानुसार, महिलांचे वय 65 वर्षांपर्यंत वाढवले आहे, उत्पन्नाच्या दाखल्याची व अधिवास प्रमाणपत्राची अटही कमी केली आहे. महायुतीच्या मेळाव्यात आज राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यां्नी याच योजनेवर भाष्य केलं. तसेच, आपल्या सरकारची ही योजना घरोघरी पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी मोलाच सल्ला दिला आहे.
सभागृहातले सावत्र भाऊ, सख्या भावाचा आव आणतात
विरोधकांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजनेवर सभागृहात ते सावत्र भावाप्रमाणे टीका करतात, पण गावोगावी सख्ख्या भावाप्रमाणे आव आणत ह्या योजनेचे फॉर्म वाटत आहेत. गावोगावी ह्यांचेच लोकं फॉर्म घेऊन उभे आहेत, असे म्हणत विरोधकांच्या चलाखपणावर फडणवीसांनी निशाणा साधला. या योजनेत आता कुठल्याही अटी-शर्ती नाहीत. तुमच्याकडे रेशनकार्ड नसेल तरीही तुम्हाला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. केवळ, हमी पत्र लिहून तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
फडणवीसांचा लाडक्या बहिणींना मोलाचा सल्ला
आपण सध्या ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने फॉर्म घेत आहोत. या दोन्ही फॉर्मची जुळवाजुळव होत आहे. ऑफलाईन फॉर्म पुन्हा ऑनलाईन टाकावे लागणार आहेत. आपण ज्या पद्धतीने येईल, त्या पद्धतीने फॉर्म घेत आहोत. केवळ अर्ज भरताना लाडक्या बहिणींनी एक गोष्ट काळजीपूर्वक केली पाहिजे, ती म्हणजे बँक खात्याचा नंबर, बँक खात्याचा नंबर चुकला तर पैसे बँक खात्यात येणार नाहीत. त्यामुळे, सर्वच महिला भगिनींनी योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य बँक खाते नंबर द्यायला हवा, सर्वच महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, कारण आम्ही ही योजना महिलांना बाहेर टाकण्यासाठी नाही तर योजनेत घेण्यासाठीच राबवत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं.