
माणदेश एक्सप्रेस न्युज
कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या जामीन अर्जावर कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात काल (दि.१) सुनावणी झाली. पोलिसांनी जामीन अर्जावर आपले लेखी म्हणणं मांडताना जामीन देऊ नये, अशी मागणी केली. यावर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
कोरटकरला न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला होता. त्याला कळंबा जेलमध्ये हलविले असून, सुरक्षिततेच्या द़ृष्टीने अंडासेलमध्ये त्यास ठेवले आहे. कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी तत्काळ जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. कोरटकरवर यापूर्वी न्यायालय आवारात दोनवेळा संतप्त जमावाकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय घेतला आहे. कोरटकर याच्या जामीन अर्जावर सुनावणी होत असल्याने पोलिस यंत्रणेने कमालीची खबरदारी घेतली होती. सकाळपासून न्यायालय परिसरासह प्रवेशद्वारावर पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता.