
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरज येथे मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन बादशाहा सय्यद (वय २७, रा. कैकाडी गल्ली, मिरज) हा मिरजमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या उत्तरेस असलेल्या झाडीत एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे बाळगून असल्याचे समजले.
सदर माहितीच्या आधारे पोह. अतुल माने व पोना. अनंत कुडाळकर यांच्यासह पथकाने उद्यान परिसरात सापळा लावून संशयितास ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
प्राथमिक चौकशीत आरोपीने सदर पिस्टल उमेश मदने (रा. बेडग, ता. मिरज) याच्याकडून खरेदी केले असल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. ही कारवाई सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वात पार पडली असून, पोना. अनंत कुडाळकर यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास म. गांधी चौक पोलीस करीत आहेत.