तुम्हालाही झोप लागत नसेल किंवा तुमची झोपमोड होत असेल तर याला झोपण्यापूर्वीच्या सवयी जबाबदार असू शकतात, असे पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांचे म्हणणे आहे.
उत्साहात काम करण्यासाठी चांगली झोप घेणे गरजेचे आहे. झोप शरीराला आणि मनाला आराम देते. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात ती मदत करते. मात्र, एव्हाना अनेकांना झोप न लागण्याची समस्या येत आहे. तुम्हालाही झोप लागत नसेल किंवा तुमची झोपमोड होत असेल तर याला झोपण्यापूर्वीच्या सवयी जबाबदार असू शकतात, असे पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांचे म्हणणे आहे.
लवनीत यांनी इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी काही सवयींचा उल्लेख केला आहे, ज्यांना टाळल्यास तुम्हाला चांगली झोप मिळू शकते. लवनीत यांनी रीलमध्ये दिलेल्या सवयी पुढील प्रमाणे आहेत.
१) झोपण्यापूर्वी फोनचा वापर
तरुणांपासून प्रोढांपर्यंत सर्वांमध्ये फोनचा वापर वाढला आहे. काही लोक झोपण्यापूर्वीही फोन वापरतात. लहान मुले मैदानी खेळ खेळण्याऐवजी मोबाईलवर दिसून येतात. स्मार्टफोनने सर्वांनाच भुरळ घातली आहे. अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी फोनवर नजर टाकतातच. ही सवय झोप न लागण्याचे कारण असू शकते. त्यामुळे, रात्री झोपण्यापूर्वी फोनचा वापर करण्याचे टाळा.
२) झोपण्यापूर्वी जड जेवण करणे
झोपायच्या आधी जास्त जेवण करणे हे झोप न येण्याचे कारण असू शकते. अधिक कॅलरी असलेले मोठे आहार पचण्यासाठी वेळ लागू शकते आणि अशात थेट झोपण्यासाठी गेल्यास तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. म्हणून रात्री उशिरा जेवण करू नये आणि झोपण्यापूर्वी जेवणाचे नियोजन करावे, असा सल्ला दिला जातो.
३) कॅफीन आणि मद्यपान
मद्यपानाने तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकते किंवा तुम्हाला झोप येण्यास त्रास होऊ शकतो. याशिवाय झोपण्यापूर्वी कोणत्याही स्वरुपातील कॅफीन घेण्याचे टाळावे. चांगली झोप घेण्यासाठी तुम्ही कॅफीनचे सेवन टाळले पाहिजे.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)