रवींद्र धंगेकर यांच्याकडून उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी अक्षरश: धारेवर ; हप्तेखोरीची यादी वाचून दाखवली…..

0
7

माणदेश एक्सप्रेस न्युज/पुणे : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. या दोघांनी उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरले. यावेळी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुमचे सर्व आरोप साफ चुकीचे आहेत, असे म्हटले.

 

त्यांच्या आरोपानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांना फैलावर घेतले. तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही पापं करताय, तुम्हाला लय समजतं का, तुम्ही दर महिन्याला 70 ते 80 लाख हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे. तुमचे कोण कोण लोक पैसे आणून देता, याची माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का, तुम्ही पुणे उदध्वस्त केलं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही?, अशा एकापाठोपाठ प्रश्नांची सरबत्ती रवींद्र धंगेकर यांनी केली.

यावेळी रवींद्र धंगेकर यांनी हप्ते घेणाऱ्या पोलिसांची नावे वाचून दाखवली. कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ, सुप्रिटेंड चरणसिंह रजपूत हे तुमच्या आशीवार्दाने हप्ते घेतात. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी चार वाजेपर्यंत कसे चालतात? आम्ही याचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत, असे रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले.

 

आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही. आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला.