अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्फोट, स्फोटाचे कारण अस्पष्ट, परिसरात खळबळ

0
68

अमरावती मध्यवर्थी कारागृहात  स्फोट झाला आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास कारागृहातील बरॅक क्रमांक 6 आणि 7 च्या समोर फटाके किंवा बॉम्ब सदृश्य स्फोट झाला. हा स्फोट नेमका कोणत्या वस्तूचा आणि का झाला याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. या स्फोटात कोणीही जखमी अथवा कोणत्याही प्रकाची जीवितहानी झाली नाही. स्फोटाची माहिती कळताच अमरावतीचे सीपी-डीसीपी आणि बॉम्ब निकामी पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आवश्यक कुमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले. घटनेची दखल घेऊन तपास सुरु करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

स्फोटाचे कारण अस्पष्ट
अमरावती सेंट्रल जेल रात्री 8.30 च्या सुमारास अचानक झालेल्या स्फोटाने दणाणून गेले. स्फोट इतका तीव्र होता की, त्यामुळे परिसरात दूरपर्यंत आवाज जाणवला. सुरुवातीला हा बॉम्बस्फोट आहे की, फटाक्यांचा स्फोट आहे याबाबत कोणतिही निश्चिती नव्हती. मात्र, स्फोटाची तीव्रता पाहता तो कोणत्या तरी मोठ्या स्फोटकाद्वारे करण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे या घटनेची माहिती अमरावती पोलिसांना तातडीने देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर पुढच्या काहीच मिनिटांमध्ये कारागृह अधिकारी आणि अमरावती पोलीस आयुक्त आणि डीसीपीसह बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल झाले.

फॉरेन्सिक पथक घटनास्थळी
अद्यापही स्फोट नेमका कशाचा होता, याबाबत स्पष्टता नाही. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल होऊन आवश्यक पुरावे आणि नमुने घेऊन गेले आहे. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हले आहे की, कारागृहाजवळून जाणाऱ्या महामार्गाच्या कल्व्हर्टवरुन अज्ञात व्यक्तीने फटाका अथवा बॉम्बसदृश्य वस्तू बॉल अथवा तत्सम वस्तूच्या सहाय्याने कारागृहात फेकला असावा. ही वस्तू फेकणारी अथवा स्फोट घडवून आणणारी व्यक्ती कोण असावी किंवा हे कृत्य करण्यापाठीमागे त्याचा उद्देश काय असावा याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. या प्रकरणात अद्याप तरी कोणाला अटक झाली नाही.

दरम्यान, सर्वांनाच फॉरेन्सीक लॅबचा अहवाल काय येतो याबाबत उत्सुकता आहे. या अहवालाच्या माध्यमातून हा स्फोट नेमका कशाचा होता. तो कोणत्या वस्तूद्वारे करण्यात आला. यांसारख्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. या प्रश्नांची उत्तरे हा स्फोट घडवून आणणाऱ्या व्यक्तीसंबंधी अधिकचा तपशील मिळवून देऊ शकतात. जेणेकरुन आरोपीला पकडण्यात पोलिसांसाठी एक महत्त्वाचा पुरावा किंवा धागादोरा तयार होऊ शकते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here