मोठी बातमी! ‘या’ दिनी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’; केंद्र सरकारकडून अधिकृत परिपत्रक जारी

0
40

माणदेश एक्सप्रेस न्युज : नवी दिल्ली : केंद्र सरकारने दरवर्षी २५ जूनला संविधान हत्या दिवस पाळणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातील एक्स पोस्ट करून माहिती दिली आहे.

अमित शाह यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर म्हटलं आहे की, “२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हुकूमशाही मानसिकतेचे लाजिरवाणे प्रदर्शन करून देशावर आणीबाणी लादून आपल्या लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला. कोणताही दोष नसताना लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले आणि माध्यमांचा आवाज बंद करण्यात आला. भारत सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस १९७५ च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या मोठ्या योगदानाचे स्मरण करेल.”

काँग्रेस पक्षाने मूलभूत स्वातंत्र्य आणि भारताचे संविधान पायदळी तुडवले होते. केवळ सत्तेला चिकटून राहण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रत्येक लोकशाही तत्त्वाचा अवमान करून देशाला तुरुंगात टाकले होते”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीच्या ४९ व्या स्मृतीदिनी म्हटलं होतं. तसंच, भाजपाने सातत्याने आणीबाणीप्रकरणावरून काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे.

‘आज २७ जून आहे. २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेली आणीबाणी हा संविधानावर थेट हल्ल्याचा सर्वात मोठा व काळा अध्याय होता. त्यानंतर संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. पण, अशा असंवैधानिक घटनांवर देशाने विजय मिळवून दाखवला. भारताला प्रजासत्ताकाची मोठी परंपरा असल्याने आणीबाणीविरोधात यशस्वी लढा देता आला’, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नव्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणाल्या होत्या.