सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का :”या” बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश, पक्ष आणखी खोलात

0
269

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|सांगली – सांगलीतील काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसला असून जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आणि वसंतदादा पाटील यांची नातसून जयश्री पाटील यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमधील विसंवाद, नेतृत्वाकडून होत असलेले दुर्लक्ष आणि वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अनियमित कर्ज प्रकरणामुळे आलेल्या दबावामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसची अवस्था जिल्ह्यात आणखी बिकट झाली आहे.

 

जयश्री पाटील यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरू होती. अखेर भाजपने बाजी मारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना शह दिला आणि महायुतीत आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले.

 

 

मदन पाटील गट काँग्रेसमध्ये सक्रिय असताना लोकसभा निवडणुकीत या गटाने अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देत प्रचारात आघाडी घेतली होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जयश्री पाटील यांना डावलून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या जयश्री पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. यामुळे त्यांना काँग्रेसने निलंबित केले होते.

 

भाजप प्रवेशासाठी जयश्री पाटील यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, भाजपचे शेखर इनामदार यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले. कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याचे आश्वासन, जिल्हा नियोजन मंडळाच्या जागा, बँक चौकशीचा ससेमिरा थोपविण्याची तयारी आणि विधान परिषदेसाठी उमेदवारीचे गाजर भाजपने दाखवले. त्यामुळे अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 

या निर्णयामुळे काँग्रेसची सांगलीतील ताकद ढासळण्याची शक्यता आहे, तर भाजपला स्थानिक पातळीवर अधिक बळकटी मिळेल. दरम्यान, या घडामोडींमुळे काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांची सांगलीतील राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत या नव्या समीकरणांचा काय परिणाम होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here