महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दिला राजीनामा

0
5

महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर मोठी उलथा-पालथ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातचं आता लोकसभा निवडणुकीत भाजप च्या खराब कामगिरीनंतर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी शनिवारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्ष सोडल्यानंतर सूर्यकांता पाटील म्हणाल्या की, ‘गेल्या 10 वर्षात मी खूप काही शिकले आहे. मी पक्षाचा ऋणी आहे.’

2014 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी फारकत घेतल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सूर्यकांता पाटील यांनी मराठवाड्यातील हिंगोली मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना तिकीट मिळू शकले नाही. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली होती.

जागावाटपाच्या वेळी हिंगोलीची जागा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी सोडण्यात आली. सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भाजपने त्यांच्याकडे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी दिली होती. शिवसेनेने हिंगोलीची जागा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून गमावली होती.

सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे चार वेळा खासदार आणि एकदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. यूपीए सरकारच्या काळात त्या ग्रामीण विकास आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री होत्या.