पंकजा मुंडेंच्या विधानावर भुजबळांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “एका समाजावर पक्ष…”

0
155

माणदेश एक्सप्रेस/नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे या ९ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक मोठं विधान केलं. “गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी आहे की एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एका समाजावर पक्ष काढून किती यश मिळेल? याची आपल्याला कल्पना नाही’, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

 

 

“कोणीही स्वतंत्र पक्ष काढू शकतं. आता पंकजा मुंडे म्हणतात त्या प्रमाणे मोठा पक्ष असेल. मात्र, माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्यावर यश मिळवणं हे कितपत यशदायी असेल याची मला कल्पना नाही. मग कोणताही समाज असो, आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत. वेगवेगळ्या घटकांनी वेगवेगळे पक्ष काढलेत. मग ते किती चालले किती नाही याचा लेखाजोखा त्यांनी घेतला पाहिजे. याचा अभ्यास त्यांनी केला असेल. पंकजा मुंडे यांनी तसं म्हटलं असलं तरी त्या लगेच पक्ष काढतील असं मला तरी वाटत नाही. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घेऊ या की दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here