
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील विकासकामांना निधी आणुन लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत असताना काही मंडळींनी विघ्न आणत आहेत. सध्या २० कोटीच्या रस्त्याचे काम सुरू असुन हे काम अडविण्याचा उद्योग झाला आहे. लोकांची गैरसोय करून कामे बंद पाडणाऱ्यांनी आधी गावासाठी निधी आणावा अशी टीका युवा नेते दत्तात्रय पाटील (पंच) यांनी केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, काही विघ्नसंतोषी लोक कामे अडविण्यासाठी पुढाकार घेत असुन नागरिकांची गैरसोय करण्यासाठी ही धडपड सुरू आहे. दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर, आमदार सुहासभैय्या बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातुन आटपाडी नगरपंचायत क्षेत्राचा सर्वांगिण विकास सुरू आहे. मोठ्या प्रमाणात निधी मंजुर होवुन आटपाडीला शहराचे रूप आणले जात आहे.
आटपाडीची नगरपंचायत निर्माण करण्यासह विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आमच्या नेतृत्त्वाने आणण्यासाठी कष्ट घेतले. रस्ते, वीज, आरोग्यासह अनेक प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी विविध माध्यमातुन प्रयत्न केले. आटपाडी शहरात आतांपर्यंत नगरपंचायत इमारतीसाठी ४.५० कोटी, मुख्य पेठेतील रस्ता ४ कोटी, गदिमा नाट्यगृह १६ कोटी, पुर संरक्षक भिंत २ कोटी, शहरातील रस्ते कामांसाठी २५ कोटी, उपजिल्हा रूग्णालय २२ कोटी, पोलीस ठाणे इमारत ४ कोटी ५० लाख, पीडब्ल्यूडी कार्यालय १ कोटी, विश्रामगृह ७५ लाख, पांढरेवाडी रस्त्यावर पुल २.५० कोटी, तलाव सुशोभिकरण ३ कोटी, आटपाडी ते पांढरेवाडीमार्गे आंबेवाडी रस्ता ९ कोटी, आटपाडी एसटी स्टॅण्ड ५ कोटी, आटपाडी शहरासाठी पाणी योजना ८४ कोटी असा भरीव निधी आमच्या नेत्यांनी सरकारच्या माध्यमातुन लोकहितासाठी पाठपुरावा करून मंजुर करून आणला.
आटपाडी पेठेतील अनेक वर्षांचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे लोकांतुन आनंद व्यक्त होत आहे. अनेक वर्षांचे प्रश्न स्व. अनिलभाऊ बाबर, आमदार सुहासभैय्या बाबर, तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातुन सुटले आहेत. सध्या सुरू असणाऱ्या रस्त्याचा आव्हानात्मक प्रश्नही नेते सोडवत आहेत. पण, काही मंडळी कामे आणुन प्रश्न सोडविण्याऐवजी लोकांच्या अडचणी वाढवत आहेत. आक्षेप घेण्यात आलेले सिध्दनाथ मंदिर गावाचे आहे. रस्ताही गावासाठीच आहे. देवस्थान कमिटीशी चर्चा करून सर्वांनी मान्यता दिल्यानंतरच रस्ते कामाला सुरूवात झाली. आणि मंदिर सभामंडपाचा पुढे येणारा काही भाग काढलेला आहे. मंदिराचे नाव पुढे करून विकासकामांना खोडा घालण्याची भुमिका जनता स्विकारणार नाही.
मंदिराचे सभामंडप तसेच ठेवले असते तर गटार आणि रस्त्याची सुमारे पाच फुट दिशा बदलुन अपघात क्षेत्र घडले असते. गावकऱ्यांनी विकासकामांना सहकार्य करावे, अशी आमची भुमिका आहे. लोकांसाठी २४ तास वेळ शहराचे प्रश्न कोण सोडवत आहेत, हे जनता जाणुन आहे. आटपाडी शहराचा कायापालट होत असताना दिशाभुल करून विघ्न आणु नये. विकासकामांना विरोध आणि कुरघोड्या करणाऱ्यांनी स्वतः शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी भुमिका घ्यावी. कामाला भरघोस निधी आणावा. रस्त्याच्या प्रश्नावरून लोकांना यापुर्वी अनेक यातना सहन कराव्या लागल्या आहेत. रस्ता तातडीने पुर्ण व्हावा, अशी लोकांची मागणी आहे. त्यासाठी आम्ही कष्ट घेत आहोत. या कामाला ब्रेक लावुन जनतेच्या विरोधातील भुमिका आटपाडीकर स्विकारणार नसल्याचे दत्तात्रय पाटील (पंच) म्हणाले.