आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. सध्या सर्वच महत्त्वाच्या पक्षातील नेते महाराष्ट्राचे दौरे करताना दिसत आहेत. तर पक्षातील काही कार्यकर्ते, आमदार यांच्याकडून निवडणुकांची तयारी केली जात आहे. अनेक पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करण्यासही सुरुवात केली आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. आता यावर अनिल देशमुख यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकासआघाडीकडून माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख हे रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात विद्यामान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनिल देशमुख काय म्हणाले?
अनिल देशमुख यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अनिल देशमुखांना देवेंद्र फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी फारच मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. “मी कधीही एकटा निर्णय घेत नाही. पक्षाकडून जे काही आदेश दिले जातात, त्यावर मी निर्णय घेतो”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.