
गेल्या काही महिन्यांपासून ‘रामायण’ सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज देशभरातील विविध सिनेमांमध्ये ‘रामायण’ सिनेमाचा टीझर शेअर करण्यात आलाय. तब्बल ३ मिनिटं ३ सेकंदांचा हा टीझर डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. या टीझरमध्ये रामायण या महाकाव्याची जादूई सफर घडतेय. या टीझरच्या अगदी शेवटी प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर कपूर तर रावणाच्या भूमिकेत साउथ सुपरस्टार यश पाहायला मिळतोय.
‘रामायण’ सिनेमाच्या टीझरची सुरुवात होते ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्यापासून. या विश्वाचा समतोल ब्रह्मा (सृष्टीकर्ता), विष्णू (पालक) आणि शंकर (संहारक) या त्रिकुटामुळे टिकून असतो. मात्र या संतुलनातूनच उगम होतो एका अनोख्या राक्षस बालकाचा जो पुढे रावण बनतो. एक अमर, अजेय आणि विध्वंसक शक्ती. त्याचे उद्दिष्ट एकच विष्णूचा नाश करणे. त्याला थोपवण्यासाठी विष्णू स्वतः मानवाचा श्रीरामाचा अवतार घेऊन पृथ्वीवर येतो. इथूनच सुरू होते एक अखंड लढाई, राम विरुद्ध रावण, माणूस विरुद्ध अमरता, प्रकाश विरुद्ध अंध:कार. हेच आहे रामायण. एका विजयाची अमर कथा. जी आजही अनेकांच्या श्रद्धा व मूल्यांना आकार देते.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या कल्पक दिग्दर्शनाखाली, नमित मल्होत्रा यांच्या प्राईम फोकस स्टुडिओज व आठ वेळा ऑस्कर विजेते DNEG VFX स्टुडिओ, तसेच यश यांच्या Monster Mind Creations यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात येणाऱ्या या भव्य चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये आणि दसरा भाग दिवाळी २०२७मध्ये IMAX वर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर— श्रीरामांच्या भूमिकेत, यश — रावण या सशक्त भूमिकेत (सह-निर्माताही), साई पल्लवी— सीता, सनी देओल— हनुमान, रवी दुबे — लक्ष्मण अशा कलाकारांची फौज असणार आहे. पहिली झलक पाहून सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.