मुंबई : विधानसभा निवडणुकीत जे झाले, ते विसरून पुढे जात आता महापालिका निवडणुकीत कंबर कसून तयारीला लागण्याचा पवित्रा मनसेने घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईत झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी विविध गोष्टींचा आढावा घेतला.
विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले असून, महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम आढावा घेणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते, पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झाली.
पत्रकारांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुका झाल्या. आता महापालिका निवडणुका आहेत. त्याला कशा प्रकारे सामोरे जायचे, यासाठी मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली होती.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची भूमिका काय असेल? पुन्हा स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय होणार की, राज ठाकरे युतीत निवडणुका लढवणार, याबाबत चर्चा आहे. याबाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, या बैठकीत प्रामुख्याने पक्षांतर्गत काय बदल झाले पाहिजेत, काय सुधारणा झाल्या पाहिजेत, यावर भर देण्यात आला होता.
दरम्यान, मुंबई महापालिकेसह अन्य अनेक ठिकाणी निवडणुका होणार आहेत. काही ठिकाणी भाजपा असेल किंवा ठाकरे गट असेल स्वबळावर लढण्याबाबत विचार करत आहेत. याबाबत मनसे काय भूमिका घेणार, अशा आशयाचा प्रश्न संदीप देशपांडे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, निश्चितपणे पक्षांतर्गत यासंदर्भात विचार, चर्चा होत असतात. त्यावरही विचारमंथन सुरू आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.