
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी नकली सिगारेट विक्रीप्रकरणी सांगली व मिरज शहरातील दोन दुकानदारांवर मोठी कारवाई केली आहे. एकूण १ लाख ६० हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
गणपती पेठ येथील ‘श्री गजानन स्टोअर्स’ येथे नकली सिगारेटची साठवणूक व विक्री केली जात असल्याची माहिती आयटीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने कारवाई केली. आरोपी बिरमा करमचंद गिडवाणी (वय ५०, रा. सांगली) याच्याकडून गोल्ड फ्लेक किंग्स लाईट – ६६३ नग – ₹१,१२,७१, गोल्ड फ्लेक किंग्स रेड – १२० नग – ₹२०,४००, गोल्ड फ्लेक हानी ड्युअ – २० नग – ₹२७,२०० असा १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर सराफ कट्टा, मिरज येथील ‘चौधरी ट्रेडर्स’ येथे सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने कारवाई केली. आरोपी मुजाहिद मेहबुब चौधरी (वय ३८, रा. मिरज) याच्याकडून नकली सिगारेट जप्त करण्यात आले. आयटीसी कंपनीच्या प्रतिनिधींनी तपासणीअंती सदर सिगारेटचे युनिक आयडी एकसारखे व बनावट असल्याचे निष्पन्न झाले. सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून संबंधित दोघा आरोपींना अनुक्रमे सांगली व मिरज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात कॉपीराईट अॅाक्ट १९५७, ट्रेडमार्क अॅक्ट १९९९ व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.