
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : राज्यभरातील अनेक बेरोजगार युवक युवतींना कोठ्यावधी रुपयांची फसवणूक करून गळाला लावलेल्या आटपाडी येथील प्राथमिक शिक्षक पोपट सूर्यवंशी व त्यांची पत्नी प्राथमिक शिक्षिका रेखा सूर्यवंशी या पती-पत्नी वर कारवाई करण्याची मागणी दिघंची येथील आर्थिक फसवणूक झालेल्या राणी जाधव यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी आटपाडी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहेत की, आटपाडी तालुक्यातील जि.प. शाळा उमाजीनगर (केंद्र दिघंची ) या शाळेत कार्यरत असणारे शिक्षक पोपट सुखदेव सूर्यवंशी मूळ गाव खांजोडवाडी यांनी मी शिक्षक संघटनेचा नेता आहे या खात्यात माझी ओळख आहे, तुम्हाला टीई.टी. पास करून नोकरी लावतो असे सांगून जुलै २०१९ मध्ये १२ लाख रुपये घेऊन व आमची फसवणूक केली आहे. तसेच त्यांची पत्नी रेखा पोपट सूर्यवंशी जि.प.शाळा पांढरेवाडी ता. आटपाडी येथे शिक्षिका आहेत. या दोघांनीही (बंटी, बबली) राज्यभरातील अनेक बेरोजगार युवक युवतींना कोठ्यावधी रुपयांची फसवणूक करून गळाला लावले आहे.
नोकरी लागत नाही तरी आमचे पैसे आम्हाला परत दे म्हणून आम्ही यांचेकडे अनेक हेलपाटे मारले आहेत परंतु हे दोघेही दाद देत नाहीत. तसेच पोपट सुर्य्वाशी यांची पत्नी, रेखा सूर्यवंशी यांनी, माझ्या घरी यायचं नाही अशी धमकी देत आहे. तसेच पोपट सूर्यवंशी फोन उचलत नाही.
शनिवार दिनांक १९ रोजी पोपट सूर्यवंशी हे कुचेकरवाडी (पळसखेल) येथील शेतात असल्याचे समजल्यावर मी व माझा लहान भाऊ पैसे मागण्यासाठी गेलो असता तुमचे कसले पैसे? कधी दिले? आम्हाला काहीही माहित नाही. मी फार मोठा माणूस आहे. माझ तुम्ही काहीही करू शकत नाही अशी धमकी दिली. तसेच दारूच्या नशेत असलेल्या पोपट सूर्यवंशी यांनी आंम्हाला अर्वाच्च शिवीगाळ केली व जीवे मारणेची धमकी दिली व माझा विनयभंग केला. याबाबत मी त्याच्यावर आटपाडी पोलीस स्टेशन येथे दिनांक १९ रोजी जी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर शिक्षक पोपट सूर्यवंशी हे त्याच्या शाळेत वारंवार गैरहजर असतो. शिक्षक संघटनेतील पदाच्या जोरावर लोकांना फसवून अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता खरेदी करणे व राजकारण्यांना हाताशी धरून कामचुकारपणा करणे हाच धंदा आहे. तरी सदर (बंटी, बबली) वर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व मला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे राणी जाधव यांनी केली आहे.