
माणदेश एक्सप्रेस न्यूज | अलिबाग– महाराष्ट्राच्या इतिहासात अढळ स्थान असलेल्या किल्ले रायगडावर आज तिथीनुसार (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. हजारो शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांनी रायगडावर हजेरी लावत गडाला शिवमय केले.
मेघडंबरीचे आकर्षण ठरले फुलांचे सजावट
राजसभागृहातील मेघडंबरी यावेळी विशेष आकर्षण ठरली. झेंडू, अष्टर, शेवंती, ऑर्किड अशा विविध फुलांनी सजवलेल्या मेघडंबरीसह संपूर्ण किल्ल्यावर फुलांची रांगोळी आणि सजावट करण्यात आली होती. फुलांच्या सुगंधाने आणि भगव्या पताकांनी गड परिसर उजळून निघाला होता.
गडदेवता शिरकाई देवीच्या पूजनाने सुरुवात
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची सुरुवात गडदेवता शिरकाई देवीच्या पूजनाने झाली. त्यानंतर पारंपरिक विधीनुसार राजसभागृहात तुलादान सोहळा पार पडला. यामध्ये शिवप्रतिमेची तुला करून त्यात अन्नधान्य, ड्रायफ्रूट्स, शालेय साहित्य यांचे दान करण्यात आले. नंतर ही मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आली.
मर्दानी खेळ व लेझीमने रंगत
होळीच्या माळावर पारंपरिक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर झाली. तलवारबाजी, लाठी-काठी, दांडपट्टा यासारख्या युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे मन जिंकले. स्थानिक आखाड्यांनी लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात सादरीकरण केले.
शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवगर्जना
संपूर्ण गडावर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या गजरात वातावरण भारावले होते. भगवे फेटे, झेंडे आणि जयघोष यामुळे रायगडावर शिवमय उत्साहाचं दृश्य पाहायला मिळालं.
राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाची उपस्थिती
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. ६ जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला होता, तर आज तिथीनुसार हा दिवशी सोहळा पार पडला.
शिवप्रेमींसाठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अनुभव
हा उत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता, तर तो एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अनुभव ठरला. शिवराज्याभिषेक दिन हा केवळ स्मरणरंजन नसून, छत्रपतींच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करण्याचा, पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचा दिवस आहे, असे आयोजकांनी सांगितले.