मूठभर तुळशीची पाने, चमचाभर गुलाबपाणी, केसांसाठी करा औषधी टोनर – असरदार घरगुती उपाय…

0
56

Homemade Tulsi Leafe Toner For Hair care : केस म्हटलं की ते काळेभोर, घनदाट, लांबसडकच असावेत असे प्रत्येकीला वाटते. आपले केस आपल्याला हवे तसेच कायम असतील असे नाही. प्रत्येकीला केसांचा काही ना काही प्रॉब्लेम असतोच. केस रुक्ष-निस्तेज होणे, केसगळती, केसांची वाढ खुंटणे, केस पातळ होणे यांसारख्या अनेक समस्या सतावतात. केसांच्या या समस्या कमी करण्यासाठी आपण काहीवेळा घरगुती उपाय करण्यावरच अधिक भर देतो. केसांसाठी घरगुती उपाय करण्यासाठी आपल्या दारातील हिरवीगार तुळशीची पाने अनेकप्रकारे फायदेशीर ठरतात.

 

 

आयुर्वेदात तुळशीच्या पानांना औषधी मानलं गेलं आहे, तुळशीची पानं केसांसाठी वरदान ठरतात. यासाठीच, तुळशीच्या पानांचे घरगुती टोनर उपयुक्त ठरु शकते. तुळशीच्या पानांचे टोनर तयार करून केसांसाठी वापरल्यास केसांना पोषण मिळते, स्कॅल्पवरील बॅक्टेरिया कमी होतात, आणि केसगळती थांबते. शिवाय, तुळशीच्या सुगंधामुळे केसांना फ्रेशनेस येतो. केस निरोगी, मजबूत आणि सुंदर ठेवण्यासाठी तुळशी पानांचा टोनर हा सोपा पण फायदेशीर उपाय नक्कीच करून पाहा. केसांसाठी तुळशीच्या पानांचे टोनर कसे तयार करायचे ते पाहूयात.

 

तुळशीच्या पानांचे घरगुती टोनर केसांवर करेल जादू…
तुळशीच्या पानांचे घरगुती टोनर तयार करण्यासाठी १० ते १५ तुळशीची पाने, ग्लासभर पाणी आणि १ टेबलस्पून गुलाबपाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.

 

तुळशीच्या पानांचा टोनर कसा करायचा ?
तुळशीच्या पानांचा टोनर तयार करण्यासाठी सर्वातआधी एका भांड्यात ग्लासभर पाणी घेऊन ते हलके उकळवून घ्यावे. पाण्याला हलकी उकळी आल्यानंतर त्यात थोडे गुलाबपाणी आणि तुळशीची पाने घालावीत. आता हे सगळे मिश्रण एकजीव करून त्याला एक हलकी उकळी येऊ द्यावी. पाणी उकळवून झाल्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी पूर्णपणे थंड होऊ द्या. पाणी संपूर्णपणे थंड झाल्यावर गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यावे.

 

तुळशीच्या पानांच्या टोनरचा वापर केसांवर कसा करावा?
स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलेले टोनर आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर केसांवर स्प्रे करु शकता. टोनर स्काल्पवर स्प्रे केल्यानंतर बोटांच्या मदतीने हलक्या हाताने स्काल्पचा मसाज देखील करून घ्यावा. त्यानंतर हे टोनर केसांवर तसेच राहू द्यावे, केस धुण्याची गरज नाही. आठवड्यातून आपण हे टोनर केसांवर ४ ते ५ वेळा वापरु शकतो. याचबरोबर, केस धुतल्यावर देखील आपण या टोनरचा वापर करु शकतो.

 

तुळशीच्या पानांचा टोनर वापरण्याचे फायदे…
१. केसागळती कमी करून केसांची मुळं मजबूत करतो.
२. स्काल्पवरील इन्फेक्शन आणि डॅंड्रफ दूर ठेवतो.
३. केस मऊमुलायम, चमकदार आणि सुंदर दिसतात.
४. टोनरने मसाज केल्यामुळे स्काल्पला चांगल्या पद्धतीने रक्तपुरवठा होतो आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here