माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात एका कंपनीत स्फोटानंतर लागलेल्या आगीत आतापर्यंत दोन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींचा आकडा हा ३४ वर पोहोचला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
डोंबिवलीतील एमआयडीसी २ फेजमधील कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. स्फोटानंतर कंपनीला आगीनं वेढलं. संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. काही क्षणांतच आगीनं रौद्ररूप धारण केलं. आसपासच्या तीन ते चार कंपन्याही आपल्या कवेत घेतल्या. तर मागील बाजूस असलेल्या कारच्या शोरूममध्येही ही आग पसरली. यात मोठं नुकसान झालं आहे. मोठी वित्तहानी झाली आहे. तर जीवितहानीही झाली आहे. आतापर्यंत दोन महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
आगीमध्ये दोन महिलांसह सहा मृतदेह आढळून आले आहेत. तर आतापर्यंत ३४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर परिसरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अजूनही कंपनीत दोन ते तीन जण अडकल्याची माहिती मिळत आहे. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, पलावा एमआयडीसी आणि ठाणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून, आग आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. डोंबिवली एमआयडीसीतील अग्निशमन केंद्रातून ही माहिती देण्यात आली आहे.