सध्या हरियाणा, जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून पूर्वतयारी सुरु आहे. निवडणुकीच्या मतदार यादीत दुरुस्ती करणे, अंतिम मतदार यादी तयार करणे अशी कामं सुरु आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मतदान करायचं असल्यास पहिल्यांदा तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणं पाहणं महत्त्वाचं आहे.
मतदार यादीत आपलं नाव कसं तपासायचं?
मतदार म्हणून आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला प्रथम निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.महाराष्ट्र सरकारच्या या https://localbodyvoterlist.maharashtra.gov.in/ObjectionOnClick/SearchName या वेबसाईटला भेट देऊन देखील मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे पाहता येईल.
या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला सर्च नेम यानुसार दोन पर्याय उपलब्ध होतील. तुमचं नाव नोंदवून, जिल्हा, मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाव नोंदवून तुम्हाला तुमचं मतदार यादीतील नाव तपासता येईल. याशिवाय आयडी कार्ड क्रमांक नोंदवण्याचा दुसरा पर्याय देखील उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्ही जिल्हा, मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था , त्या संस्थेचं नाव आणि मतदार ओळखपत्र क्रमांक नोंदवून मतदार यादीतील नाव तपासून पाहता येईल.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर नाव कसं शोधायचं?
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर देखील तुम्ही तुमचं मतदार यादीतील नाव तपासून पाहता येईल. त्यासाठी
https://electoralsearch.eci.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर तीन पद्धतींचा वापर करुन मतदार यादीतील नाव तपासून पाहता येईल. यामध्ये पहिली पद्धत मतदार ओळखपत्राची माहिती भरुन, दुसरी पद्धत मतदाराची सविस्तर माहिती भरुन आणि मोबाईल क्रमांक नोंदवून देखील मतदार यादीतील नाव तपासता येईल.
पहिल्या पद्धतीत तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्राचा क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर राज्य महाराष्ट्र निवडावं लागले. यानंतर कॅप्चा कोड नोंदवून आपलं नाव तपासता येईल.
दुसऱ्या पद्धतीत मतदाराचं संपूर्ण नाव, जन्मतारीख, वय, मतदाराचं राज्य, भाषा, जिल्हा आणि मतदारसंघ यासह इतर माहिती नोंदवावी लागेल.
तिसऱ्या पद्धतीत मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी क्रमांक नोंदवल्यानंतर तुमचं मतदार यादीत नाव आहे की नाही हे पाहता येईल.
दरम्यान, मतदारांनी मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासून घेणं आवश्यक आहे. निवडणुकीदरम्यान मतदानाच्या दिवशी कधी कधी काही मतदारांची नावं मतदार यादीत नसल्याचं देखील पाहायला मिळत असतं.