शेतात काम करीत असताना वीज प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

0
471

शेतात काम करीत असताना वीज प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची मोठी घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपुर गावात घडल्याने खळबळ उडाली आहे. वन्यप्राणीपासून शेतीचे होणारे नुकसान किंवा रानडुक्करच्या बंदोबस्तासाठी शेताच्या कुंपणात वीज पुरवठा सोडण्याचा प्रकारातून तर ही दुर्घटना घडली नाही ना याची चौकशी केली जात आहे. दुसरीकडे तुटलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन शेतकरी मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर येथे शेतात शेतकरी सकाळी शेतीच्या कामासाठी गेले होते. तिथे काम करीत असताना ही दुर्दैवी घटना घडली. पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे, नानाजी राऊत ,अशी मृतक शेतकऱ्यांची नावे आहेत. या घटनेत एक शेतकरी गंभीर जखमी आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्युत प्रभावित तारा शेतात पडून राहिल्या होत्या ,असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे वीज केंद्राचे अधिकारी घटनास्थळी पोहचल्यावर सत्य समोर येणार आहे. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच चोकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here