महत्वाची बातमी! ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमाद्वारे फक्त 100 रुपयांत मिळणार 4 वस्तू

0
439

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम आहे. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान घरोघरी गोडधोड जेवण तयार केलं जातं. महाराष्ट्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने हाच उत्सव डोळ्यासमोर ठेवून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून पुन्हा एकदा ‘आनंदाचा शिधा’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत पात्र कुटुंबांना फक्त 100 रुपयांत चणाडाळ, तेल, साखर, रवा मिळणार आहे. ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सरकारने मात्र काही अटी ठेवल्या आहेत.

आनंदाच्या शिध्यात काय काय मिळणार?
गणेश चतुर्थीचे निमित्त साधून सरकारतर्फे हा आनंदाचा शिधा दिला जात आहे. या आनंदाच्या शिध्यात एकूण चार वस्तू असतील. फक्त 100 रुपयांत या चारही वस्तू मिळणार आहेत. यात चणाडाळ (1 किलो), सोयाबीन तेल (1 लिटर), साखर (1 किलो), रवा (1 किलो) या चार वस्तू मिळतील.

कोणाला मिळणार लाभ?
सराकरच्या या उपक्रमाचा लाभ जे कुटुंब अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधरक आहे, त्यांना मिळणार आहे. सोबतच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनाही हा आनंदाचा शिधा दिला जाईल. छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.