सांगलीत बॉडी बिल्डिंगसाठी उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई, तिघांना अटक

0
2472

अंमलीपदार्थ विक्रीची अनेक प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहे. आता सांगली (Sangli Crime News) परिसरात उत्तेजक इंजेक्शनची विक्री होत होती. मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन हे बॉडी बिल्डींग किंवा नशा करण्यासाठी वापरण्यात येते. शरीरसौष्ठवचा व्यायाम करणारे युवक व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पिळदार स्नायूंचे आकर्षण दाखवून त्यांना या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश विटा पोलिसांनी केला आहे.

याप्रकरणी दिलीप बाबूराव ठोंबरे (वय 48 , रा. नेहरूनगर, विटा), सुशांत हिंदुराव जाधव (वय 27, रा. पुणदी रोड, तासगाव, मूळगाव हातनोली) आणि अमरदीप रामचंद्र भंडारे (वय 40, रा. कार्वे, ता. खानापूर) या तिघांना अटक केली आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातील मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 8 हजार रुपये किमतीच्या 16 सीलबंद बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विटा शहर व आसपास महाविद्यालय परिसरात युवकांना पिळदार स्नायूंच्या आमिषाने मेफेनटरमाइन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची तक्रार विट्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी हवालदार उत्तम माळी यांच्यासह पोलिस पथकाने तेथे सापळा लावला. त्यावेळी विटा येथे कंपाउंडरचे काम करणारा दिलीप ठोंबरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 16सीलबंद बाटल्या सापडल्या. त्यवेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता या प्रकरणात त्याला मदत करणाऱ्या सुशांत जाधव व अमरदीप भंडारे या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली

मुख्य आरोपीला अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान
पोलिसांनी सुशांत जाधव याला तासगावमधून, तर अमरदीप भंडारे याला कार्वे येथून अटक केली. विटा पोलिसांनी तरुणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मात्र, हे इंजेक्शन संशयित तिघेजण कुठून खरेदी करीत होते, याचा मुख्य तपास करून त्यांच्याही मुसक्या आवळण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

आरोपींकडून 145 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त
मेफेनटरमाइन सल्फेट या इंजेक्शनचा वापर हा हृदयदाब वाढविण्यासाठी केला जातो. एमडी आणि एमबीबीएस पदवी असलेल्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय या इंजेक्शनची विक्री करता येत नाही. कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध वापरल्यास विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर मावळातील शिरगावमध्ये उत्तेजक इंजेक्शन विकणाऱ्या दोघांना अटक केली. शिरगाव पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून 145 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.