
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायत हद्दीतील बाजार पटांगण परिसर तसेच शुक्र ओढ्यालगत वाढलेल्या अतिक्रमणांवर नगरपंचायत प्रशासनाकडून मंगळवार दि. 19 मे 2026 पासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून स्वखर्चाने अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आटपाडी शहरातील बाजारपटांगण येथे दर शनिवारी आठवडी बाजार भरत असतो. या बाजारासाठी तालुक्यासह इतर भागातील शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र बाजारासाठी जागा अपुरी पडत असल्याने अनेक व्यापारी शुक्र ओढ्यालगत असलेल्या ब्राम्हण घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
याशिवाय बाजारपटांगण ते सांगोला चौक या मार्गावरील ओढ्यालगत झालेल्या अतिक्रमणांमुळेही रहदारीची समस्या वाढली आहे. नगरपंचायत मालकीच्या जागांवरही अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत कौन्सिलच्या दि. 20 मार्च 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत अतिक्रमण हटविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने नगरपंचायत प्रशासनाकडून बाजारपटांगण परिसरातील शुक्र ओढ्याच्या दक्षिण भागातील ब्राम्हण घाटाकडे जाणारा रस्ता, अंबाबाई मंदिराकडे जाणारा मार्ग तसेच सांगोला चौकापर्यंतच्या रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नगरपंचायत मालकीच्या जागेवरील अतिक्रमणांवरही बुलडोझर चालविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, संबंधित अतिक्रमणधारकांची बैठक आज सोमवार दि. 18 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता तहसील कार्यालय, आटपाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रशासनाच्या कारवाईपूर्वी नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवावे, अन्यथा 19 मेपासून सुरू होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.


