भीषण अपघातात केजचे तहसीलदार यांचा मृत्यू ; सांगली जिल्ह्याचे मिरज तालुक्याचे सुपुत्र होते

0
1

माणदेश एक्सप्रेस न्युज
बीड : लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ आज गुरुवारी (ता. ९) पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास रेणापूर फाट्याजवळ त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, गिड्डे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातावेळी ते कारमध्ये एकटेच असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत गिड्डे यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

सांगलीचा सुपुत्र; कर्तव्यदक्ष अधिकारी
तहसीलदार राकेश गिड्डे हे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एरंडोली गावचे रहिवासी होते. तरुण आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक निधनामुळे महसूल विभागात शोककळा पसरली आहे.

खासदार विशाल पाटील यांची श्रद्धांजली
या घटनेनंतर सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी गिड्डे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनामुळे प्रशासनाने एक होतकरू आणि जबाबदार अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here