“फुला”चा दमदार ट्रेलर लाँच; वाघ्या-मुरळी परंपरेतून स्त्री संघर्षाची प्रभावी कहाणी १७ एप्रिलला प्रेक्षकांसमोर

0
474

माणदेश एक्सप्रेस न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील वाघ्या-मुरळी संस्कृतीवर आधारित आणि एका स्त्रीच्या संघर्षाची भावनिक, संगीतमय कहाणी मांडणारा “फुला” हा मराठी चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच करण्यात आला असून, टीजरनंतर आलेल्या या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. येत्या १७ एप्रिल रोजी हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित होणार आहे.

पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांच्या माध्यमातून चित्रपटाची प्रस्तुती करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील वास्तव, परंपरा आणि सामाजिक विसंगती यांचे अत्यंत जिवंत चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते.

चित्रपटाची कथा एका अशा मुलीभोवती फिरते, जिचं लहान वयातच खंडोबाशी लग्न लावलं जातं. परंपरेच्या नावाखाली तिचं आयुष्य ठरवलं जातं आणि तिचं स्वतंत्र अस्तित्व समाजाच्या चौकटीत हरवून जातं. मात्र, या सगळ्या परिस्थितीत ती मुलगी स्वतःसाठी कशी उभी राहते, तिचा संघर्ष कसा आकार घेतो, आणि समाजाच्या बंधनांवर ती कशी मात करते, याचं प्रभावी आणि अंतर्मुख करणारे चित्रण “फुला”मध्ये पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्राच्या पारंपरिक कलांमधील तमाशा फड, जागरण-गोंधळ यांसारख्या लोकसंस्कृतींचा समृद्ध पट या चित्रपटात उलगडतो. एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा झपाट्याने होणारा विकास आणि दुसरीकडे अजूनही समाजावर घट्ट पकड ठेवून असलेल्या परंपरा—या विरोधाभासाला चित्रपट अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित करतो. देखण्या दृश्यरचना, अस्सल ग्रामीण वातावरण, आणि भावनिकतेला भिडणारे संगीत यामुळे हा चित्रपट वेगळ्या उंचीवर नेला गेला आहे.

आटपाडी तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन या चित्रपटाची निर्मिती केली आहे, ही बाब विशेष लक्षवेधी आहे. निंबवडे सारख्या ग्रामीण भागात चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून, त्यामुळे कथेला वास्तवाची जोड मिळाली आहे. सात गाण्यांनी सजलेला हा चित्रपट संगीतमय पद्धतीने कथा सांगतो, ज्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे.

चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अभिषेक जावीर यांचे असून पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे, तर सर्जनशील दिग्दर्शन अमर देवकर यांनी केले आहे. गीतलेखन रवीकिरण जावीर आणि समाधान ऐवळे यांनी केले असून छायांकन प्रताप जोशी यांनी केले आहे. संकलनाची जबाबदारी राहुल प्रजापती यांनी सांभाळली आहे.

चित्रपटातील गाणी प्रसिद्ध गायक-गायिकांनी साकारली आहेत. यात वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे आणि आकाश नवगिरे यांचा समावेश आहे. कलाकारांमध्ये प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट आणि शरद लांडगे या नव्या दमाच्या कलाकारांचा समावेश असून त्यांच्या अभिनयाची झलक ट्रेलरमध्येच प्रभावीपणे दिसून येते.

नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांनी केले असून, वेशभूषा कोमल जावीर आणि अक्षता पाटील यांनी साकारली आहे. रंगभूषेची जबाबदारी समाधान भोरे यांनी पार पाडली आहे.

ग्रामीण पार्श्वभूमी, लोकपरंपरेची जपणूक आणि एका स्त्रीच्या अस्तित्वासाठीच्या लढ्याची हृदयस्पर्शी कहाणी मांडणारा “फुला” हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच नाही, तर विचार करायलाही भाग पाडणार आहे. त्यामुळे १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here