Atpadi : वादळी पावसाचा कहर! शेटफळे येथे घरांचे उडाली पत्रे; शेतकरी कुटुंब उघड्यावर

0
541

माणदेश एक्सप्रेस न्युज 

आटपाडी (प्रतिनिधी) :
आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा कहर केला असून, शेतकरी कुटुंबांवर अक्षरशः संकट कोसळले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही क्षणांतच राहत्या घरांवरील पत्रे कागदासारखी उडून गेल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत.

या घटनेत नामदेव कांबळेलक्ष्मण कांबळे यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवसभर शेतात मेहनत करून रात्री निवांत झोपण्यासाठी असलेला घराचा आसरा एका क्षणात नाहीसा झाल्याने संबंधित कुटुंबांवर मोठे संकट ओढवले आहे.

घरावरील छप्पर उडून गेल्यामुळे घरातील अन्नधान्य, कपडे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी निसर्गाच्या या अवकृपेने शेतकरी कुटुंबे हादरली आहेत.
कष्ट करून घर उभे केले होते, पण एका क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं,” अशी हळहळ पीडित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

आधीच पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही घटना आणखी धक्कादायक ठरली असून, आता डोक्यावरचे छप्परही गेल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.


🟨 प्रशासनाला तातडीचे निर्देश

घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती पृथ्वीराज तानाजीराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य विनायकशेठ मासाळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी स्थानिक प्रशासन व महसूल विभागाला पंचनामा करून बाधित शेतकरी कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.

यावेळी सरपंच महेंद्र भोरे, माजी उपसरपंच सोमनाथ गायकवाड, विजय देवकर, तसेच सतीश गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, संजय गायकवाड, सुनील गायकवाड, गुलाब कांबळेबजरंग लेंगरे उपस्थित होते.


🔴 शासनाकडून मदतीची अपेक्षा

सदर घटनेनंतर शेटफळे गावातील नागरिकांनी शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व निवारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अवकाळी पावसामुळे सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाने तातडीने दिलासा देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here